कोल्हापूर : दुर्गम वस्त्यांमधील 51 कुटुंबांची घरे सौरऊर्जेने उजळली | पुढारी

कोल्हापूर : दुर्गम वस्त्यांमधील 51 कुटुंबांची घरे सौरऊर्जेने उजळली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दुर्गम वाडी-वस्तीमध्ये पिढ्यान्पिढ्या अंधारात राहणार्‍या 51 कुटुंबांची घरे मंगळवारी सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळून निघाली. माजी गृह राज्यमंत्री आ. सतेज पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त कॉनसॉफ्ट कंपनीने भेट देऊन दुर्गम, डोंगराळ भागातील या कुटुबांच्या जीवनात खर्‍या अर्थाने प्रकाश आणला.

पिढ्यान्पिढ्या अंधार आणि अठराविश्व दारिद्य्र असलेल्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील वाडी-वस्तीवर अजूनही लाईट पोहोचलेली नाही. त्यामुळ अंधारात असलेल्या अनेक कुटुंबांच्या घरात आजही प्रकाशासाठी रॉकेलचा दिवा वापरला जातो; पण सध्या रॉकेलही मिळत नाही आणि महागाईने डिझेल परवडत नाही. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशाने रात्र काढणार्‍या या 51 कुटुंबांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्याचे काम कॉनसॉफ्ट कंपनीचे विनय जोशी यांनी आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही अनोखी भेट देऊन केले आहे. ‘सतेज ऊजा’च्या माध्यमातून 5 व्हॅटचे 3 बल्ब, 6000 एमएएचची बॅटरी, 10 व्हॅटचे सौर पॅनेल या 51 कुटुंबांच्या घरी जोडण्यात आले आहे. यातील प्रत्येक बल्ब हा 3 मोडमध्ये कार्य करतो. सामान्य मोडमध्ये सलग 20 तास, मध्यम मोडमध्ये सलग 12 तास, हाय मोडमध्ये सलग 9 तास हे बल्ब काम करतात.

समाजातील गोरगरीब लोक, गरजवंत यांच्या मदतीसाठी आमदार सतेज पाटील हे सतत प्रयत्नशील असतात. विविध अडचणीवर मार्ग काढून, ती समस्या सोडविण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निंगुडगे, गजरगाव, हारूर, हंदेवाडी यासारख्या अनेक गावांतील 51 कुटुंबांना घरे ‘सतेज ऊर्जा’च्या माध्यमातून प्रकाशमय केले.

आणखी काय हवे- जनाबाई सुतार

‘आज मी खूप आनंदात आहे. आमच्या आयुष्यातील अंधार आज दूर झाला. देवासारखी मला माणसं भेटली, ….आणखी काय हवे,’ असे भावपूर्ण उद्गार गजरगावच्या जनाबाई सुतार यांनी काढले. आमदार सतेज पाटील यांचे त्यांनी आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

Back to top button