कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरीच्या वाकीघोल परिसरात हत्तीचे आगमन; नागरिकांत घबराहट

दिनेश चोरगे

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : गेले महिनाभर भुदरगड तालुक्यात तळ ठोकून असलेल्या हत्तीचे शनिवारी (दि.१२) रात्री भुदरगड तालुक्यातील कोंडोशीमधून राधानगरी तालुक्यातील वाकीघोल या परिसरात आगमन झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. दरम्यान, तोरस्करवाडी पैकी करपे मळ्यातून दाखल झालेला हत्ती वडाचीवाडी, हेळेवाडी मार्गे सावर्देच्या जंगलात गेला असून वन्यजीव विभागाचे पथक त्याच्या मार्गावर आहे.

महिन्याभरापूर्वी आजरा तालुक्यातील सुळेरानमधून भुदरगड तालुक्यातील डेळे -चिवाळे परिसरात प्रवेश केलेल्या या हत्तीने नंतर तांबाळे, शिवडाव परिसरात बरेच दिवस तळ ठोकला होता. भुदरगड तालुक्यात येणारे हत्ती २०१४ पासून कोंडोशी लघुपाट बंधारे प्रकल्पापासून तोरस्करवाडीमार्गे राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरात येत असल्याचा अनुभव आहे. यापूर्वी २०१४, २०१८, २०१९ आणि आता २०२४ साली याच मार्गाने हत्ती काळम्मावाडी जलाशयाच्या बॅक वॉटर परिसरात दाखल झालेले आहेत. २०१८ साली आलेल्या टस्करने तर काळम्मावाडी जलाशयातून बाहेर पडत राधानगरी- फोंडा राज्यमार्ग ओलांडून राधानगरी जलाशय पार करत राधानगरी अभयारण्यातून गगनबावडा गाठला होता.

२०१४ साली हत्तीने तोरस्करवाडी येथील बाळकू आरेकर या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. तर २०१८ साली एका वनमजुराचा बळी घेतला होता. त्यामुळे पुन्हा हत्तीच्या आगमनाने वाकीघोल परिसर भीतीच्या छायेत आहे. वाकीघोल परिसरात दाखल होणारा हत्ती शेतकऱ्यांची ऊस पिके, केळी, नारळाची झाडे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे वाकीघोल परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी हत्ती असलेल्या परिसरात एकटे जाऊ नये, तसेच गव्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्री-अपरात्री करत असलेली शेतातील राखण बंद करावी, असे आवाहन वाकीघोल ग्रामीण विकास मंडळाचे सचिव सुनील कांबळे यांनी केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT