कोल्हापूर

Dainik Pudhari Paypeet Campaign | ‘पायपीट’ उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीला नवी प्रेरणा; ‘दैनिक पुढारी’चा स्तुत्य उपक्रम

Dainik Pudhari Paypeet Campaign | ‘दैनिक पुढारी’च्या ‘पायपीट’ या उपक्रमांतर्गत दुर्गम भागांतून डोंगरवाटा ओलांडत शाळेत पोहोचणाऱ्या २५ विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील गजापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक आगळावेगळा अनुभव मिळाला. ‘दैनिक पुढारी’च्या ‘पायपीट’ या उपक्रमांतर्गत दुर्गम भागांतून डोंगरवाटा ओलांडत शाळेत पोहोचणाऱ्या २५ विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शुभेच्छापत्र देऊन त्यांच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्नशील राहणाऱ्या या मुलांच्या संघर्षाला सन्मान मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास व उत्साह दुणावला आहे.

या उपक्रमासाठी गजापूर हायस्कूलची निवड करण्यात आली होती. या शाळेत विशाळगड, मुसलमानवाडी, केंबुर्णेवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी व भाततळी या दुर्गम गावांतून २ ते ५ किलोमीटर पायपीट करून विद्यार्थी दररोज शाळेत येतात. या मार्गात घनदाट जंगल व वन्यजीवांचा धोका असूनही, विद्यार्थ्यांचा शिक्षणावरील दृढ विश्वास व न थांबणारी जिद्द याचे चित्र येथे पाहायला मिळते.

‘दैनिक पुढारी’च्या 'पायपीट' उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ साहित्य वाटप न करता विद्यार्थ्यांच्या संघर्षाला समाजमान्यतेचा सन्मान दिला जातो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संजयसिंह पाटील होते. त्यांच्यासह माजी उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, मुख्याध्यापक के. ए. पाटील, शिक्षक व ‘पुढारी’ प्रतिनिधी यांचाही उपक्रमात सहभाग होता.

“रोज ४ किमी चालून शाळेत येते. दम लागतो पण शिकण्याची इच्छा जास्त आहे. आज मिळालेल्या साहित्यामुळे प्रेरणा मिळाली. मोठं व्हायचं स्वप्न अजून पक्कं झालंय.”
विद्यार्थिनी दीक्षा पवार
“ 'दैनिक पुढारी'ने 'पायपीट' उपक्रम राबवून या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले आहे. त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अधिक वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल, याची मला खात्री आहे."
संस्थापक संजयसिंह पाटील
“हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जिद्दीला बळ देणारा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवीन ऊर्जा निर्माण होते.”
मुख्याध्यापक के. ए. पाटील
'दैनिक पुढारी'चा 'पायपीट' उपक्रम हा केवळ शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नाही, तर दुर्गम भागांतील मुलांच्या शिक्षणाची प्रेरणा आहे. ही मुले दररोज मैलोन्-मैल चालत शाळेत येतात, त्यांच्या संघर्षाला सलाम करत, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे."
शरद पाटील, माजी उपसरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT