

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या सततच्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर आणि परिसरात अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शहरालगत असलेले राजाराम आणि शिंगणापूर बंधारे पावसामुळे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे वाहतूक आणि वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, सध्या ती १४ फूटांवर पोहोचली आहे. ही स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.