

कोल्हापुरात अलीकडेच एका कार्यक्रमात अनोखा राजकीय दृश्य पाहायला मिळाला. एका कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात कॅरमचा मैत्रीपूर्ण सामना रंगला. या प्रसंगाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
ही घटना शारंगधर देशमुख यांच्या कार्यक्रमात घडली. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, त्यामुळे त्यांचे शिवसेनेकडे झुकाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, शारंगधर देशमुख हे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
आता ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत असल्याने कोल्हापूरच्या राजकारणात नवा रंग भरला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि खासदारांच्या मैत्रीपूर्ण कॅरम सामन्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमात दोघांनीही सहजतेने सहभाग घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.