कोल्हापूर

गडहिंग्लज पूर्व भागातील गावे संपर्कहीन

निलेश पोतदार

गडहिंग्लज : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. काल रात्री चंदगड राज्य मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे. तर आज पहाटेपासून पूर्व भागातील जरळी बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. यामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागासह चंदगड मार्गावरील गावे संपर्कहीन झाली आहेत. आज (दि.२४) दुपारी बारा वाजेपर्यंत भडगाव पुलावर पाच ते आठ इंचापर्यंत पाणीपातळी होती. पावसाचा जोर ओसरला तर सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत हा पूल खुला होऊ शकतो.

हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी व घटप्रभा नदीवरील कानडेवाडी हे बंधारे अद्याप पाण्याखालीच असून, येथील वाहतूक बंदच राहिली आहे. तालुक्यात रविवारी दिवसभरात जोरदार सरी कोसळल्या. उगमक्षेत्रासह पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस असल्याने हिरण्यकेशीचे पाणी पात्राबाहेर पडले. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील महत्त्वाचा भडगाव पूल रात्री नऊच्या सुमारास पाण्याखाली गेला. तत्पूर्वी सायंकाळी पोलिस प्रशासनाने आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांना भडगाव पूल पाण्याखाली जाणार असल्याचा इशारा देत पर्यायी मार्ग निवडण्याचे आवाहन केले. रात्री बॅरेकेटिंग करुन येथील वाहतूक बंद करण्यात आली. भडगाव मार्गावरील वाहने बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागावमार्गे सोडली जात आहेत.

निलजी बंधारा, भडगाव पूल बंद झाल्याने पूर्व भागात जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या जरळी बंधार्‍यावर आज पहाटेपासून पाणी वाढले आहे. बंधार्‍यालगतच्या सखल रस्त्यांवर अधिक पाणीपातळी असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व भागातील गावांचा गडहिंग्लज शहराशी होणारा थेट संपर्क तुटला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT