कोल्हापूर

Zero Shadow Day : ‘राहमे छोडके साया भी चला जाता है’!शाहुवाडीकरांनी ‘शून्य सावलीचा’ चा घेतला अनोखा अनुभव

अमृता चौगुले

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : 'राहमे छोडके साया भी चला जाता है' या जुन्या हिंदी गाण्याच्या या गाण्याच्या अर्थाप्रमाणे जेव्हा कुणीच साथ देत नसतं तेव्हा सावलीदेखील सोडून जाते, असं म्हटलं जातं. मात्र शुक्रवारी दुपारी भर माध्यान्ही सावलीने देखील साथ सोडल्यासारखा आभास निर्माण झाला. निमित्त होतं शून्य सावली अनुभवण्याचं. (Zero Shadow Day)

सपाट पृष्ठभागावर उन्हात उभे राहिल्यास आपली सावली जवळपास हरवल्याचाच प्रत्यय अनेकांना आला. अर्थात या 'झिरो शॅडो डे' बाबत फारसा गवगवा झालेला नव्हता. तरीही काही जागरूक नागरिकांनी हा एक वेगळा अनुभव असल्याचे आवर्जून नमूद केले. (Zero Shadow Day)

शुक्रवारी १२ वाजून २५ मिनिटांपासून जवळजवळ ५२ सेकंदांपर्यंत सावलीने साथ सोडली होती. वस्तूंची सावली शुन्य झालेली आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर ५२ सेंकदानंतर सावली पुन्हा दिसण्यास सुरवात झाली. 'झिरो शॅडो डे' अर्थात उभ्या असलेल्या माणसाला त्याच्या पायाखालीसुध्दा न दिसणारी सावली शाहूवाडीकरांना अनुभवता आली. (Zero Shadow Day)

शुक्रवारी हा अनोखा अनुभव शाहूवाडी गणेशनगरातील विद्यार्थी व पालकांनी घेतला. कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्यांना वर्षातून दोन वेळेला शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. मात्र, कर्कवृत्ताच्या वरील भागात, तर मकरवृत्ताच्या खालील भागात राहणाऱ्या लोकांना 'झीरो शॅडो डे' म्हणजे शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येत नाही.

आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, त्याला २३.५ डिग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या भासमान मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र व १२ तासांचा दिवस असतो. या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर वरून पडतात. त्यामुळे विषुववृत्तावर कोठेही उभे राहिले, तरी काही काळासाठी आपली सावली नाहीशी होते.

खगोल शास्त्रानुसार असा काही दिवस असतो, हे माहितीच नव्हते. कदाचित माझ्या वाचनात आला नसावा. पण आता समजल्यावर हा एक वेगळा अनुभव बघायला मिळाल्याचा आनंद होतोय.
– सत्यजित पाटील, शाहूवाडी

वर्षात कोणता तरी एक दिवस असा असतो हे ऐकले होते, पण तो दिवस कोणता ते ज्ञात नव्हते. तो दिवस आजचाच असल्याचे समजल्याने मला एक नवीन माहिती मिळाल्याचे समाधान वाटले.
– सायली पाटील, शाहूवाडी

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT