Cable thieves run rampant in Sainik Takli; 70 farmers suffer losses worth ₹8 lakh
सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा रात्री पुन्हा केबल चोरट्यांनी सैनिक टाकळीच्या कृष्णाकाठावर भला मोठा डल्ला मारला आहे. चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की आता शेतकरीच विचारत आहेत, पोलिसांचा धाक राहिला आहे का ? पुन्हा एकदा या प्रकारामुळे आमदारांच्या अधीक्षक भेटीचा केवळ फार्स ठरल्याचे दिसून येत आहे.
काल रात्री चोरट्यांनी तब्बल ७० शेतकऱ्यांच्या किमान सात ते आठ लाख रुपयांच्या केबली लंपास केल्या. पाण्यात उतरून पंपापासून ते स्टार्टरपर्यंत जमिनीत गाडलेल्या केबलीसुद्धा उपसून काढून नेल्या. म्हणजे आता जमिनीत गाडूनही केबल सुरक्षित नाही, ही परिस्थिती आहे.
पण यापुढे तर चोरट्यांनी धाडसाची सर्व हद्दच ओलांडली आहे. चोरलेल्या केबली दूर न नेता त्याच ठिकाणी जाळून त्यातील फक्त तांबे घेऊन गेले आहेत. किमान एक किलोमीटरच्या पट्ट्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा केलेल्या केबली जाळण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागला असावा. तरीही त्यांनी इतक्या धाडसाने त्याच ठिकाणी केबली जाळून त्यातील फक्त तांबे घेऊन पोबारा केला. तीन-चार तास एकाच ठिकाणी आगीचा धूर आणि जाळ, तरीही कुणालाच चाहूल लागली नाही, हेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे.
ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या पाच वर्षांत किमान २०० ते २५० शेतकऱ्यांच्या विद्युत केबली चोरीस गेल्या आहेत. प्रत्येक वेळी तक्रार, प्रत्येक वेळी आश्वासन, पण चोर मात्र मोकाटच. त्यामुळेच आता चोरट्यांच्या धाडसामुळे पोलिसांचे आणि चोरांचे लागेबांधे असण्याचा संशय बळावला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी हाच प्रश्न आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होऊनही चोर सापडतच कसे नाहीत?
शेतकरी आता वैतागला आहे. केबल आणायची, बसवायची, चोरीला जायची आणि पुन्हा केबल आणायची, या चक्रात शेतकरी पुरता कर्जबाजारी झाला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी पंप आहे, पण पंपाला केबलच नाही, अशी अवस्था झाली आहे.
त्यामुळे वैतागलेल्या कृषी पंप धारकांनी आता थेट एल्गार पुकारला आहे. उद्या सोमवार दिनांक ३०/११/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृषी पंप धारक कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. चोरांना पकडल्याशिवाय घरीच जाणार नाही, या मतावर कृषी पंप धारक ठाम झाले आहेत.
शक्तिपीठ महामार्गाच्या बंदोबस्तात इतका मोठा फौजफाटा लावून गोरगरीब शेतकऱ्यांची गळपटी पकडून पोलीस गाडीत कोंबुन तिथल्या शेतकऱ्यांचा शाप घेण्यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांच्या केबली चोऱ्या होत आहेत. गेली पाच वर्ष त्याकडे या पोलिसांच लक्ष नाही. गोरगरिबांना मारहाण करून तुमचं बळ दाखवण्यापेक्षा तात्काळ त्या चोरांच्या मुसक्या आवळुन या शेतकऱ्यांच आशीर्वाद घ्या. तुमच्या लेकरा बाळांच भलं होईल.मा.खा.राजू शेट्टी