

free adult movie link click phone hang woman loses 10 lakh rupees ahmedabad cyber fraud
पुढारी ऑनलाईन : अहमदाबादमधील वटवा परिसरात मोफत चित्रपट पाहण्याच्या नादात एका महिलेच्या बँक खात्यातून ९.९७ लाख रुपये काढण्यात आले. महिलेचा १७ वर्षीय मुलगा इन्स्टाग्रामवर रील पाहत असताना त्याला ‘vibedeck’ नावाची लिंक दिसली. या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये APK फाइल डाउनलोड झाली आणि फोन हँग होऊ लागला.
सोशल मीडियावर दिसणाऱ्या मोफत ऑफर्स आणि मनोरंजनाच्या आमिषाला बळी पडून अनेक जण अनोळखी लिंकवर क्लिक करतात. मात्र, अहमदाबादमधील एका कुटुंबाला असे करणे चांगलेच महागात पडले आहे. येथे इन्स्टाग्रामवर मोफत चित्रपट पाहण्यासाठी डाउनलोड केलेल्या एका APK फाइलमुळे महिलेच्या बँक खात्याला मोठा धोका निर्माण झाला. सुरुवातीला मोबाईल हँग झाला आणि त्यानंतर बँक खात्यातील शिल्लक तपासली असता तब्बल ९.९७ लाख रुपये गायब झाल्याचे समोर आले.
ही घटना अहमदाबादमधील वटवा परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिला घरकाम करतात. त्यांना दोन मुले आहेत. महिलेचा १७ वर्षीय मोठा मुलगा आईच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम वापरत होता. काही दिवसांपूर्वी तो इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्याला एका रीलमध्ये मोफत चित्रपट पाहण्यासाठी ‘vibedeck’ नावाची लिंक दिसली.
मुलाने फारसा विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर मोबाईलमध्ये ‘vibedeck’ नावाची APK फाइल डाउनलोड झाली. ही फाइल डाउनलोड होताच मोबाईल हँग होऊ लागला. काही वेळाने मोबाईल आपोआप अपडेट होऊ लागला. मुलाने याबाबत आईला सांगितल्यानंतर महिलेने फोन तपासला आणि तो दुरुस्तीसाठी दिला.
मोबाईल दुरुस्त करून आणला, तर बँक खात्यातून लाखो रुपये गायब
मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर महिला तो घरी घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासली असता त्यांना मोठा धक्का बसला. खात्यात केवळ ३.४७ लाख रुपये शिल्लक होते. प्रत्यक्षात महिलेच्या बँक खात्यात यापूर्वी सुमारे १३ लाख रुपये जमा होते.
महिलेने बँक स्टेटमेंट काढून तपासणी केली असता वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून एकूण ९.९७ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. एका अज्ञात व्यक्तीने ही रक्कम काढली होती.
यानंतर महिलेने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अनोळखी लिंक आणि APK फाइल डाउनलोड करण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत. मोफत चित्रपट किंवा अन्य कोणत्याही ऑफरच्या नावाखाली आलेली अनोळखी फाइल डाउनलोड करण्यापूर्वी विशेष सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.