कोल्हापूर

कोल्हापूर : बिद्री कारखाना विनाकपात टनास ३२०० रुपये दर देणार

Shambhuraj Pachindre

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखाना यावर्षी गळीतास येणाऱ्या ऊसाला 'एफआरपी' प्रमाणे विनाकपात ऊस टनास ३२०० रुपये दर देण्यात येणार आहे. उर्वरित उत्पन्न विभागणी सुत्रानुसार होणारी ऊसाची जादा रक्कम देण्याचा नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली.

बिद्री ( ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या ऊस गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक आर. डी. देसाई होते.

यावेळी गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीताचा प्रारंभ कार्यकारी संचालक के. एस. चौगले व त्यांच्या पत्नी सौ. राधिका चौगले यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी ऊस तोडणीचा प्रारंभ मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील तर ऊस वजन काट्याचे पूजन वर्क्स मॅनेजर एस. बी. भोसले यांच्या हस्ते झाले.

यावेळी चौगले म्हणाले, यावर्षी १० लाख मेट्रीक टनाचे गाळप करण्याचे उदिष्ट आहे. ऊस तोडणी व वाहतुकीसाठीचे करार पूर्ण झाले आहेत. ऊस तोडणीच्या ३७५ कायम स्वरूपी टोळ्या बांधल्या आहेत. तर सुमारे ६०० ऊस वहानांची उपलब्धता करण्यात आली आहे. कारखान्याकडे ठेवलेल्या ठेवीला १० टक्के प्रमाणे होणारी व्याजाची रक्कम संबंधिताच्या खात्यावर जमा केली आहे. ज्या ठेवीदारांनी खात्याची माहिती कळविली नाही त्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा. असे आवाहन केले. यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर यांचे भाषण झाले.

यावेळी सेक्रेटरी एस. जी किल्लेदार, चिफ अकौंटट एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट महेश सलगर, चिफ केमिष्ट पी. पी. शिंदे, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, सिव्हील इंजिनिअर बी. बी. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे यांच्यासह खाते अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सतिश घोरपडे यांनी केले. आभार एस. जी. किल्लेदार यांनी मानले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT