Bharat Havale Jungle Mitra Gaganbawda : पी.एचडी. म्हणजे केवळ ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि पुस्तकांमधील अभ्यास नव्हे. पर्यावरण व वनस्पती-जीवशास्त्र संशोधकांसाठी खरे संशोधन सुरू होते ते जंगलाच्या वाटांवर, डोंगर-दऱ्यांमध्ये, नदीच्या उगमाजवळ आणि निसर्गाच्या कुशीत. अशा क्षेत्रीय संशोधनात संशोधकांना आपल्या परिसराच्या जैवविविधतेची अचूक माहिती असलेला स्थानिक मार्गदर्शक मिळणे ही मोठी जमेची बाजू असते. गगनबावडा तालुक्यातील तळये गावचे भरत मारुती व्हावळे हे अशाच अनेक संशोधकांसाठी विश्वासू ‘जंगलमित्र’ ठरले आहेत.
विशेषतः प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि जैवविविधता या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रजाती शोधण्यासाठी, त्यांचे अधिवास समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष जंगल परिसरात अभ्यास करण्यासाठी भरत यांची मोठी मदत होते. विशेष म्हणजे, या सर्व मदतीसाठी ते कोणतेही मानधन घेत नाहीत. केवळ मैत्री आणि संशोधनाला हातभार लागावा या भावनेतून ते हे काम करतात.
पी.एचडी.च्या संशोधनासाठी अनेकदा विशिष्ट प्राणी, सर्प, कीटक किंवा वनस्पतींचा शोध घ्यावा लागतो. काही प्रजाती दिवसाऐवजी रात्री सक्रिय असतात. अशा वेळी जंगलातील अपरिचित वाटा, डोंगरकडे, ओढे आणि दुर्गम भागात संशोधकांना घेऊन जाण्याची जबाबदारी भरत पार पाडतात. रात्री-अपरात्री संशोधकांसोबत जंगलात फिरताना परिसराची माहिती, प्राण्यांच्या हालचालींचे संकेत, संभाव्य अधिवास आणि सुरक्षिततेची काळजी याबाबत ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे संशोधकांसाठी भरत हे केवळ वाटाडे नसून प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनातील एक महत्त्वाचा सहकारी बनले आहेत.
गगनबावडा तालुका हा समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा परिसर आहे. तळये गाव आणि त्याच्या आसपासच्या जंगल-पर्वतीय भागाशी भरत यांचा लहानपणापासूनच जवळचा संबंध आहे. सर्प, विविध वन्यप्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्याबद्दल त्यांना विशेष माहिती आहे.त्यांचे शैक्षणिक शिक्षण M.Sc. Environment पर्यंत झाले असून पर्यावरण आणि जैवविविधतेविषयीची त्यांची आवड त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून अधिक समृद्ध केली आहे.
भरत यांच्या जंगलप्रेमामागे त्यांचे वडील मारुती व्हावळे यांचा मोठा वाटा आहे. ते वनसेवक म्हणून कार्यरत आहेत. वडिलांसोबत जंगलात फिरताना भरत यांना परिसरातील वन्यजीव, वनस्पती आणि जंगलाचे बारकावे समजत गेले.गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, वणवे विझवण्यासाठी जंगलात जाणे, वन्यजीवांच्या रेस्क्यूमध्ये सहभागी होणे अशा विविध अनुभवांमधून त्यांची जंगलाशी नाळ अधिक घट्ट होत गेली. पुढे हीच आवड त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली.
भरत व्हावळे हे ‘वनराज Expedition’ या पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमाचे संस्थापक आहेत. त्यासोबतच ते साखर कारखान्यात सी.पी.यू. केमिस्ट म्हणून कार्यरत असून शेतीही करतात. नोकरी, व्यवसाय आणि शेती सांभाळतानाही संशोधकांना मदत करण्यासाठी ते वेळ देतात.
आजपर्यंत अनेक पी.एचडी. विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी भरत यांनी क्षेत्रीय पातळीवर मदत केली आहे. काही विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण झाले असून काहींचे संशोधन अद्याप सुरू आहे.एखाद्या संशोधकाला एखादी विशिष्ट प्रजाती शोधायची असेल, तिच्या अधिवासापर्यंत पोहोचायचे असेल किंवा दुर्गम भागात प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असेल, तर भरत त्यांच्यासोबत उभे राहतात. त्यांच्या या मदतीमुळे संशोधकांचा वेळ वाचतो आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधन अधिक सुलभ होते.‘संशोधन करणाऱ्यांना मदत करणे ही माझी जबाबदारी नाही, पण निसर्गाने मला जे शिकवले आहे ते इतरांच्या उपयोगी पडावे, एवढीच इच्छा आहे,’ हीच त्यांच्या कार्यामागची भावना असल्याचे त्यांचे मित्र सांगतात. .
भरत हा आमचा विद्यार्थी आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अगदी कष्टाने त्याने त्याची M.Sc. पूर्ण केली. तेव्हाही तो सोबतच्या तसेच ज्युनिअर विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिटसाठी घेऊन जायचा आणि आज सद्यःस्थितीलाही तो आमच्या मदतीसाठी निःशुल्क उभा असतो. विद्यापीठात असताना त्याने अनेक जीवांचे रेस्क्यू करून त्यांना जीवनदान दिले आहे. तो एक जन्मजात निसर्गाभ्यासक आहे.प्रा. डॉ. आसावरी जाधव, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र, शिवाजी विद्यापीठ
गगनबावडा परिसराचा अचूक अभ्यास असणाऱ्या भरतने फील्ड वर्कमध्ये खूप मदत केली आहे. कोणता जीव कोणत्या ठिकाणी सापडेल याचा त्याला बराच अनुभव आहे. इको टुरिझमसाठी भरत चांगले काम करत आहे.प्रा. डॉ. एस. एम. गायकवाड, शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर जिल्ह्यातील गोगलगायी या संशोधनासाठी कोदे डॅम परिसर व वळताई देवी परिसर एक्सप्लोर करणे केवळ भरतमुळे शक्य झाले. या जैवविविधतापूर्ण भागाचा भरत खऱ्या अर्थाने अभ्यासू मार्गदर्शक आहे. माझ्या पूर्ण संशोधन करणाऱ्या बॅचला भरतची खूप मदत झाली आहे.डॉ. अमृत भोसले, संशोधक - ठाकरे वाइल्डलाईफ
माझ्या संशोधनात भरतचा सिंहाचा वाटा आहे. माझे बरेचसे सॅम्पल भरत ज्या भागात राहतो तेथेच मिळाले. तेथे रात्री सॅम्पल कलेक्शनसाठी जंगलात सोबत येणे, एव्हाना त्याला मिळालेले सॅम्पल कीटक तो मला आणून द्यायचा. कोणतीही पूर्वमैत्री नसताना माझ्या राहण्याची व जेवणाची सोय भरतने कोणताही मोबदला न घेता केली. त्याचा मी जन्मभर ऋणी असेन.प्रा. डॉ. योगेश माने, पाटण, सातारा
शिवाजी विद्यापीठात इतर मित्रांकडून भरतसोबत ओळख झाली. माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गवळण किड्यांची जैवविविधता या संशोधनात भरतची खूप मदत झाली; कारण संशोधनातले बरेचसे नमुने भरतच्या गावाशेजारीच मिळाले ते शोधण्यात त्याची फार मदत झाली. त्याला मिळालेले अनेक सॅम्पल त्याने स्वतः विद्यापीठात आणून दिलेत. सोबतच आमच्या राहण्या-खाण्याची सोयही त्याने केली होती.प्रा. डॉ. गोपाळ राऊत, बार्शी, सोलापूर
मत्स्य प्रजाती संशोधनासारख्या किचकट विषयात भागातील प्रजाती कलेक्शनमध्ये भरतने खूप सहकार्य केले. कोणताही मोबदला न घेता पडेल ती मदत करणाऱ्या भरतला खरंच सलाम आहे.प्रा. डॉ. रुपेश यादव, मुंबई
माझे संशोधन कुंभी-कासारी नदीवर सुरू आहे. त्या नदीचा उगम व कुंभी-कासारी नदीचा संगम जो एकदम अडचणीच्या भागात आहे तो भरतदादामुळे सहज मिळाला. माझ्या संशोधनासाठी लागणारी इत्यंभूत माहिती दादाने मला दिली, ज्याचा खूप फायदा झाला आहे. अजूनही मी तेथे जाण्याआधी भरतदादाला फोन करूनच जातो, त्याने एकदाही मला टाळाटाळ केली नाही.गणेश मासेडा, पालघर
फील्ड वर्कसाठी भरतची खूप मदत होते. त्याच्या घरचेही त्याच्याइतकेच प्रेमळ आहेत, घरच्या मुलीप्रमाणे वागवतात मला. कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीसाठी भरतचा मोठा वाटा असेल.सोबियानाज मोमीन, ईश्वरपूर, सांगली
जैवविविधतेने समृद्ध अशा गगनबावड्यामध्ये माझ्या संशोधनातील अनेक ऑर्किड वनस्पती शोधण्यासाठी भरतचा मोलाचा वाटा आहे. भरतसोबतच त्याचा भाऊ समाधान व्हावळे याची देखील खूप मदत होते. त्याचं पूर्ण कुटुंबच मदतीसाठी नेहमी तत्पर असते.मयूर जाधव, कोल्हापूर