आदमापुरात बाळूमामांची बकरी भुजवणे कार्यक्रम उत्साहात (Pudhari Photo)
कोल्हापूर

Adampur Balumama | भाविकांच्या मांदियाळीत आदमापुरात बाळूमामांची बकरी भुजवणे कार्यक्रम उत्साहात

चांगभलंच्या जयघोषात... भंडाऱ्याच्या उधळणीत...भाविकांच्या उपस्थितीत बकरी पूजन

पुढारी वृत्तसेवा

Adampur Bakri Bhujwane

प्रा.शाम पाटील

मुदाळतिट्टा : बाळूमामाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात, भंडाऱ्याच्या मुक्त हस्ते उधळणीत श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे दीपावली ‌पाडव्या (दि.22 ) दिवशी बाळूमामाची बकरी पूजनाचा व भुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांच्या मांदियाळीत संपन्न झाला. बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन व बकरी भुजवणे या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते.

प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते ढोल, कैताळच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंढ्याची रास करण्यात आली. या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती. सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या. बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात भुजवण्यासाठी (पळवणे) बकरी आणण्यात आली. सुवासिनींनी बकऱ्यांचे पूजन केले.

बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली. यावेळी दूध ऊतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ही प्रथा बाळूमामांनी चालू केली होती. ज्या दिशेला हे दूध उतू जाईल, त्या दिशेला पाऊस पीकपाणी उत्तम राहते, अशी कल्पना- भावना लोकांच्या मध्ये आहे. आणि आजपर्यंत घडतही तसं आले आहे. यावर्षी उत्तर बाजूला दूध बाहेर गेले ने हा विभाग सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित भाकीत या प्रथेतून समोर आले आहे. प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

विविध जाती धर्मातील भक्ताने आणलेला दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला. सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा आदमापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमास अध्यक्ष धैर्यशील राजेभोसले, कार्याध्यक्षा लक्ष्मण होडगे, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, दिलीप पाटील, संभाजी पाटील, विजय गुरव, इंद्रजीत खर्डेकर, रणवीरराजे भोसले, राजनंदिनी भोसले, भिकाजी शिंणगारे, भिकाजी चव्हाण विविध संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT