शिरोळ : अंकुश शेतकरी संघटना आक्रमक, शिरोळ-हातकणंगले तालुक्यात आंदोलन 
कोल्हापूर

शिरोळ : अंकुश शेतकरी संघटना आक्रमक, शिरोळ-हातकणंगले तालुक्यात आंदोलन

रणजित गायकवाड

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील जवाहर, पंचगंगा, शरद व गुरुदत्त साखर कारखान्यांनी मशीन ऊस तोड वजावट ५ टक्के ऐवजी १ टक्के करावी, या मागणीसाठी अंकुश शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आज आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिरोळ, उदगाव, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, धरणगुत्ती, सैनिक टाकळी, दत्तवाड यासह अन्य गावातील ऊस तोड व वाहतूक रोखण्यात आली.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता व कारखानदारांचे होणारे नुकसान विचारात घेऊन शिरोळ, जयसिंगपूर, आणि कुरुंदवाड पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आंदोलकांना पहाटे चार वाजता ताब्यात घेतले. यामध्ये आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चूडमुंगे, राकेश जगदाळे भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख-गावडे, विजय पाटील, बाणदार, उदय होगले, दत्तात्रय जगदाळे, उदय दळवी, सागर पुजारी यांचा समावेश आहे. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे संतापलेल्या आंदोलकांनी गुरुदत्त शुगर बरोबर हातकणंगले तालुक्याकडे जाणारी सर्व उसाची वाहने रोखून धरली.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानकपणे घरातून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हा कार्यक्रम कारखान्याशी संगणमत करून नियोजनबद्ध राबवला आहे. लोकशाहीमध्ये मत मांडणे, आंदोलन करणे याचे स्वातंत्र्य असतानाही पोलिसांकडून दबाव वाढवण्यात येत आहे. कारखानदारांनी पोलिसाकडे असणाऱ्या अधिकाराचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्याचा डाव असल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला.

आंदोलनकर्त्यांचे पोलिस ठाण्यात उपोषण

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि कारखानदारांना मदत करण्यासाठी शेतकरी चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध करीत असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT