Amit Shah Kolhapur rally  Pudhari
कोल्हापूर

Amit Shah Kolhapur rally : "हा देश 'धर्मशाळा' नाही.." : उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अमित शहांच्‍या काँग्रेसवर हल्‍लाबोल

संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेंबरोबर असल्‍याचा कोल्‍हापूरमधील सभेत व्‍यक्‍त केला विश्‍वास

पुढारी वृत्तसेवा

Amit Shah Kolhapur rally : "ज्या काँग्रेस पक्षाच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, तो पक्ष घुसखोरांचा 'व्होट बँक' म्हणून वापर करून आपले अस्तित्व टिकवू पाहतोय. मी त्यांना सांगतो, हा देश काही 'धर्मशाळा' नाही; इथे केवळ याच देशात जन्मलेले लोकच राहतील," असे ठणकावत आता शिवसेनेत कोणताही गट नाही संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर आहे, असे सूचक विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले. येथे आयोजित धन्‍यवाद सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी प्रस्‍थापित केला नवा विक्रम

यावेळी अमित शहा म्‍हणाले की, "पंतप्रधान मोदींनी देशाचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे. जेव्हा स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही १२ वर्षे भारताचा विकास, भारतीय संस्कृतीचा पुनरुज्जीवन, सुरक्षित भारताची निर्मिती आणि जागतिक स्तरावर भारताचा वाढलेला सन्मान यांसारख्या कामगिरींसाठी ओळखली जातील. या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते गंगासागर आणि संपूर्ण देशभर भाजप व एनडीएची (NDA) सत्ता विस्तारण्याचे काम झाले आहे.

आम्ही देशभरातील प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढू

मागील निवडणुकीत बंगालच्या जनतेनेही भाजपला आपला आशीर्वाद दिला. मी तुम्हाला खात्री देतो की, केवळ बंगालच्या सीमांवरील घुसखोरीच थांबणार नाही, तर आम्ही देशभरातील प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढू."

संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेंबरोबर

यावेळी अमित शहा म्‍हणाले की, यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटाचे नेते म्‍हटलं जायचं; पण आता कोणताही गट नाही संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर आहे, असे सूचक विधान करत अमित शहा यांनी अप्रत्‍यक्षपणे 'ऑपरेशन टायगर'वर भाष्‍य केले.

अंबाबाई मंदिराचा विकास हे संपूर्ण देशाचे स्वप्न : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

"अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा शुभारंभ सोहळा आज पार पडत आहे. अंबाबाई हे केवळ कोल्हापूरचेच नाही, तर संपूर्ण देशातील जनतेचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा भव्य विकास व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हीच इच्छा व्यक्त केली होती. 'अंबाबाई मंदिराचा जसा विकास व्हायला हवा होता, तसा तो स्थानिक पातळीवर झाला नाही' असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला. आज त्यांच्याच हस्ते या विकासकामांचा शुभारंभ होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

'अमित शहा आणि कोल्हापूरचे एक भावनिक नाते'

अमित शहा आणि कोल्हापूरचे एक भावनिक नाते आहे. महाराष्ट्रात अधिक मास म्हणजेच 'धोंड्याचा महिना' साजरा करण्याची परंपरा आहे. या महिन्‍यात जावयाची विशेष सेवा केली जाते. अमित शहा यांचे आगमन चार दिवस उशिरा झाले असले, तरी आम्ही तुमची सेवा करण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही. तुमचे आशीर्वाद घेऊन आम्हाला हे विकासाचे काम करण्याची संधी मिळाली आहे, ते आम्ही उत्तम प्रकारे पूर्ण करू. त्यांनी महाराष्ट्रात येऊन जेव्हा विविध कामांचे लोकार्पण केले, तेव्हा आम्हाला काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळाली," असा विश्‍वासही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

आज सभा सुरु असतानाच 'महाराष्ट्र एकीकरण समिती'च्या काही कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी केली. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT