Amba Ghat Highway Update
विशाळगड : आंबा घाटातील दख्खन गावाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली होती. घाटाच्या चौपदरीकरणासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक मोठी दरड रस्त्यातच कोसळल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच, रवी इन्फ्रा कंपनीने तात्काळ मदतकार्य सुरू केले. तीन फोकलंड, दोन जेसीबी, पाच डंपर आणि मनुष्यबळाच्या मदतीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू झाली आणि संध्याकाळी सहापर्यंत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाली.
या भागातील डोंगर चौपदरीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात कापण्यात आल्याने अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी माती आणि दगड रस्त्यावर आले होते, ज्यामुळे वाहतूक अनेक तास थांबली होती. सतत डोंगराचा भाग कोसळत असल्याने प्रवासी आणि वाहनचालक धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या समस्येवर तात्पुरते उपाय केले जात असले तरी, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने पावसाळ्याच्या दिवसांत घाटातून प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.