

Ratnagiri Kolhapur highway news Amba Ghat Road closure
रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खन जवळ आज (दि.१८) पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी पाच यंत्रांच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
गेले चार पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सध्या काम सुरु आहे. कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने वाहतूकदार धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. हे काम करत असताना ठेकेदारांनी मात्र योग्य ती काळजी न घेतल्यामुळे त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.
रविवारी तसेच सोमवारी आंबा घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. रविवारी यामुळे वाहतूक संथ झाली होती. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु होती. सोमवारी सकाळी दख्खन जवळ भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक संपूर्ण ठप्प झाली आहे. सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्यास अडथळा येत आहे. तहसीदार व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.