Kolhapur Malkapur Bus
सुभाष पाटील
विशाळगड : कोल्हापूरहून मलकापूरकडे आणि मलकापूरहून कोल्हापूरकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेचा सध्या मोठा फज्जा उडाला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी बस नियोजित वेळेवर सुटत नसल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मलकापूर आगाराच्या या 'अंदाधुंदी' कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, एसटी प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
मलकापूर आणि कोल्हापूर ही दोन्ही शहरे व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जोडलेली आहेत. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. प्रशासनाने कागदावर बसचे वेळापत्रक दिमाखात लावले असले, तरी प्रत्यक्षात मात्र गाड्या वेळेवर येत नाहीत. सायंकाळी ५ नंतर तर परिस्थिती अत्यंत गंभीर होते. तासन् तास बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना स्थानकावरच तिष्ठत बसावे लागते. रात्रीच्या वेळी तर बस मिळेल की नाही, याची खात्री उरलेली नाही.
वेळेवर बस नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत महिला आणि वृद्ध प्रवाशांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. बसच्या या अनिश्चिततेचा फायदा खासगी वडाप चालक घेत असून, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याचे शाहूवाडी येथील मन्सूर मुजावर यांनी सांगितले. मलकापूर आगाराच्या नियोजनाच्या अभावामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
या संदर्भात मलकापूर आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तांत्रिक कारणांमुळे फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याचे मोघम उत्तर दिले जात आहे. मात्र, दररोजचा हा मनस्ताप आता प्रवाशांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे
"मी दररोज कामानिमित्त कोल्हापूरला येते. सायंकाळी ६ वाजता बस येणे अपेक्षित असते, पण कधी ७ तर कधी ८ वाजतात. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची नीट सोय नाही, त्यात बसचा पत्ता नसतो. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये."— सुनिता पाटील, नियमित प्रवासी
"मलकापूर आगाराचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. चौकशी खिडकीवर विचारले तर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. गाड्या नादुरुस्त असल्याचे कारण दिले जाते. जर गाड्याच नसतील तर वेळापत्रक कशाला लावले आहे?"— संदीप थोरात, नोकरदार
"रात्रीच्या वेळी कोल्हापूरहून मलकापूरला जाण्यासाठी बसच मिळत नाही. आम्हाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, जे परवडणारे नाही. एसटी प्रशासनाने तातडीने जादा गाड्या सोडाव्यात, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल."— विनायक कदम, विद्यार्थी