

सतिश सरीकर
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या पक्षाच्या ए बी फॉर्मवर पक्षाच्या सचिवांची स्वाक्षरी स्कॅन केलेली आहे असा आक्षेप विरोधी भाजपच्या उमेदवार जस्मिन आजम जमादार यांनी घेतला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी सुनावणी घेतली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर जमादार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उत्तुरे यांचा अर्ज निवडणूकीसाठी वैध ठरवून त्यांना पत्र देण्यात आले.
प्रतिज्ञा उत्तुरे या प्रभाग क्र. १५ मधील ब - ओबीसी महिला प्रवर्गातून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवित आहेत. भाजपच्या जस्मिन जमादार यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (दि. ३१) छाननीवेळी जमादार यांनी उत्तुरे यांच्या अर्जावर हरकत घेत तक्रार अर्ज दिला. पक्षाच्या ए बी फॉर्मवर अधिकृत इसमाची ओरीजिनल सही नसल्याचे तक्रारीत म्हटले. त्यामुळे उत्तुरे यांचा अर्ज बाद ठरवून अवैध करावा अशी मागणी जमादार यांनी केली.
अधिकारी काळबांडे यांनी कागदपत्रांची तपासणी केली. उत्तुरे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या ए बी फॉर्मवर पक्षाचे सचिव अनिल देसाई यांची निळ्या शाईची बॉलपॉईंट पेनची स्वाक्षरी असलेली व पक्षाची मुद्रा निळ्या रंगामध्ये उमठविली असल्याचे दिसले. त्यानुसार जमादार यांचा तक्रार अर्ज फेटाळून उत्तुरे यांचा अर्ज वैध ठरवत असल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी काळबांडे यांनी दिला.