

काही दिवसांपूर्वी शहरात 'कोल्हापूर कसं?' असे सांगणारे फलक झळकले होते. सुरुवातीला यावर कोणत्याही पक्षाचे नाव नव्हते, मात्र नंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे आपले निवडणूक कॅम्पेन असल्याचे जाहीर केले होतं.
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहरात महापालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा आता उडू लागला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने शहरात सुरू केलेल्या 'कोल्हापूर कसं? तुम्ही म्हणशीलात तसं' या कॅम्पेनला आता विरोधकांनी पोस्टरच्या माध्यमातूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "सत्ता असताना भरलं खीस, आता म्हणताय कोल्हापूर कसं?" अशा आशयाच्या पोस्टर्सची सध्या कोल्हापुरात 'पोस्टर वॉर' चांगलेच रंगले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात 'कोल्हापूर कसं? तुम्ही म्हणशीलात तसं' असे पोस्टर झळकले होते. सुरुवातीला यावर कोणत्याही पक्षाचे नाव नव्हते, मात्र नंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे आपले निवडणूक कॅम्पेन असल्याचे जाहीर केले. आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी कोल्हापूरकरांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसने हे अभियान राबवले होते, अशी माहिती 'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी दिली.
काँग्रेसच्या कॅम्पेनची चर्चा सुरू असतानाच, आता दुसरे पोस्टर शहरात झळकले आहे. यामध्ये काँग्रेसच्या जुन्या सत्ताकाळावर थेट निशाणा साधण्यात आला आहे. "सत्ता असताना भरलं खीस, आता म्हणताय कोल्हापूर कसं?" असा खोचक सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रत्युत्तर देणाऱ्या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचे नाव किंवा चिन्ह नाही. आता पुढील १५ दिवसांमध्ये महानगरपालिका प्रचाराचा धुरळा मोठ्या प्रमाणावर उडणार आहे. त्यापूर्वी शहरात रंगलेले पोस्टर वॉर हे महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष टोकाचा होणार असल्याची नांदी ठरले आहे.