Shaktipeeth Highway Survey Ajra
आजरा : कृष्णा सावंत
आजरा तालुक्यातील पोळगाव, खानापूर, एरंडोळ येथे महसूल विभागाने पोलीस फाट्यासह सुरू केलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला आज सकाळी तीव्र विरोध केला. कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल यंत्रणेने मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. मोजणीसाठी आवश्यक उपकरणांसह यंत्रणा सज्ज झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. पोलीस बळाचा वापर करून आजरा तालुक्यातही शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आधीपासूनच संताप होता.
दरम्यान शेतकऱ्यांना बेसावध ठेवून मोजणीचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक मोर्चे, आंदोलनातून आपला विरोध दाखवून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून पोलीस बळाचा वापर करायचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो संघटितपणे शांततेच्या मार्गाने हाणून पाडू, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. समितीने तातडीने जाऊन तीव्र विरोध दर्शवला. तहसीलदार समीर माने यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी काँ. संपत देसाई, सुधीर देसाई, संभाजी पाटील, युवराज पोवार,नामदेव फगरे,संजयभाई सावंत,भिमराव माधव, प्रकाश मोरूसकर, दिनेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.