Kolhapur Cold Wave | कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला; पारा १५.२ अंशांवर

कोल्हापूर : बापरे! काय ही थंडी म्हणत बालचमू स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घालून रंकाळा चौपाटीवर वावरताना.
कोल्हापूर : बापरे! काय ही थंडी म्हणत बालचमू स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घालून रंकाळा चौपाटीवर वावरताना. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापुरात हिवाळ्याची चाहूल आता अधिक तीव्र झाली आहे. शनिवारी थंडीचा कडाका आणखी वाढला असून किमान तापमानाने यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळी गाठली. दैनंदिन सरासरी किमान तापमानात २.९ अंशांची घट होऊन पारा १५.२ अंशांवर घसरला. यामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरत आहे. सायंकाळनंतर गारठा अधिकच जाणवत आहे.

शहरात शनिवारी पहाटे थंडीची तीव्रता अधिक होती. काही भागांत धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र होते. दिवसभर कमाल तापमान ३०.६ अंश नोंदवले गेले असले, तरी सायंकाळनंतर तापमानात घट होऊन वातावरणात गारवा वाढत आहे. बोचऱ्या वाऱ्यामुळे प्रत्यक्ष जाणवणारी थंडी अधिक तीव्र होत असून, रात्री उशिरा आणि पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

थंडी वाढल्याने शहरातील विविध भागांत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री आणि पहाटे कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक स्वेटर, जॅकेट, कानटोपी आणि मफलरचा वापर करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मागणी वाढल्याने दसरा चौक परिसरातील कपड्यांच्या दुकानांमध्ये स्वेटर, जॅकेट आणि इतर हिवाळी कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ ते मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने सध्या जाणवत असलेल्या थंडीच्या कडाक्यात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.