

एकनाथ नाईक
कोल्हापूर : ‘आई, मला खायला दे... पप्पा, मला घरी न्या’ काळजाचा ठोका चुकवणारी ही आर्त सीपीआरच्या विलगीकरण कक्षातून येत होती. मात्र, रेबीजसारख्या जीवघेण्या संसर्गाची भिंतमध्ये उभी असल्याने पोटच्या गोळ्याला जवळ घेण्याचीही हिंमत त्या हतबल आई-वडिलांमध्ये नव्हती. डोळ्यांत अश्रूंचा महापूर आणि हातापायांत अवसान नसताना केवळ दुरूनच आपल्या लाडक्या लेकीचा जीवघेणा संघर्ष पाहण्याची दुर्दैवी वेळ संतोष आणि सुरेखा चौगुले या दाम्पत्यावर आली. अखेर शनिवारी पहाटे आठ वर्षांच्या चिमुकल्या रेवतीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
बोरिवडे (ता. पन्हाळा) येथील रेवती संतोष चौगुले ही जवाहर विद्यामंदिर शाळेत दुसरीत शिकत होती. घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम. वडील सेंट्रिंगच्या कामावर जातात, तर आई सुरेखा मोलमजुरी करून संसार सांभाळते. चौथीत शिकणारा मोठा भाऊ श्रीतेज आणि रेवती असे हे चौकोनी कष्टाळू कुटुंब. रेवती स्वभावने अत्यंत हसतमुख आणि मनमिळाऊ असल्याने शाळेत व गल्लीत तिचा मोठा मित्र परिवार होता.
नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीदिवशी रेवती आनंदाने शेजाऱ्यापाजाऱ्यांना ‘सोनं ’ वाटत होती. त्याच वेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेली रेवती पळताना गटारीत पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ती बरी झाली. नेहमीचा हसरा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. मात्र महिनाभरानंतर या आनंदाला दृष्ट लागली.
१९ नाेव्हेंबरपासून रेवतीला अचानक चक्कर येणे, डोळे पांढरे होणे, पाण्याची भीती वाटणे अशी रेबीजसदृश लक्षणे दिसू लागली. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी तिला सीपीआर येथे दाखल केले. रेबीजच्या तीव्र लक्षणामुळे डॉक्टरांनी विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू केले. नातेवाईकांना जवळ जाण्यास मनाई करण्यात आली होती. लेकीच्या यातना पाहून आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अखेर पहाटे रेवतीने अखेरचा श्वास घेतला.
विलगीकरण कक्षात वेदनेने तडफडणारी रेवती
विलगीकरण कक्षात वेदनेने तडफडणारी चिमुकली रेवती आपल्या आई -वडिलांना पाहून ‘मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या’ अशा आर्त हाका मारत होती.