भरपावसात तोडफोड, घोषणाबाजी; आंदोलनाचे लोण गजापूरपर्यंत File Photo
कोल्हापूर

Encroachment at Vishalgad| भरपावसात तोडफोड, घोषणाबाजी; आंदोलनाचे लोण गजापूरपर्यंत

अतिक्रमणे काढण्यावरून वातावरणात तणाव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सकाळपासून धो-धो पाऊस सुरू होता. या पावसातही शिवभक्तांच्या वाहनांचे ताफे विशाळगडच्या दिशेने येत होते. बघता बघता विशाळगडचा पायथा गर्दीने भरला. घोषणाबाजी सुरू झाली.

तितक्यात विशाळगडवर काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची बातमी आंदोलकात येऊन धडकली. आंदोलकांचा पारा चढला. संताप अनावर झाला आणि मग सुरू झाली तोडफोड, जाळपोळ, दगडफेक. बघता बघता समोरील दुकाने फुटू लागली.

गाड्या पलटी होऊ लागल्या. हातात काट्या, पार, कटावणी, हातोडा हवेत नाचू लागले. दिसेल त्या दुकानावर त्याचे घाव घालण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेमुळे भरपावसातही विशाळगडचे वातावरण तापले. तोडफोडीची सुरुवात विशाळगडच्या पायथ्यापासून सुरू झाली असली, तरी त्याचे लोण पाच किलोमीटर अंतरावरील गजापूर गावापर्यंत पोहोचले.

या गावाच्या मुख्यरस्त्याकडेला असलेली मशीद पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणाहून धूमसणाऱ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागताच पोलिसांनी कसे तरी तेथील संतप्त जमावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली.

कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांना झुगारून त्यांच्यासमोरच तोडफोडीचा हा प्रकार सुरू होता.

पोलिस व जमाव आमने-सामने जमावाकडून तोडफोडीचे सुरू असल्याचे प्रकार थांबविण्याचा प्रयत्न काही ठिकाणी पोलिस करत होते.

पोलिसांनी एखाद्या जमावातील व्यक्तीला पकडले, तर इतर जमाव पोलिसांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे या जमावाला नियंत्रणात आणणे पोलिसांनाही अशक्य होऊ लागले. जसा वेळ जाईल तसा जमाव अधिकच हिंसक बनत गेला. दहा ते पंधरा जणांचा गट एखाद्या दुकानात, घरात घुसायचा फोडाफोडी करायचा आणि मगच बाहेर यायचा.

दोन हजार पोलिसांचा फौजफाटा जमावाला शांत करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह महूसल विभागातील तसेच पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रयत्नशील होते. सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गॅसचा स्फोट झाल्याची चर्चा

जमाव इतका हिंसक बनला होता की, जमावाने काही दुकाने आणि घराला आग लावली. यावेळी एका दुकानातील गॅसचा स्फोट झाल्याची चर्चा होती. या स्फोटाच्या आवाजाने गजापूर परिसर हादरला. जमावासह नागरिकांची पळापळ झाली. परिसरात एकच घबराट पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT