कोल्हापूर

कोल्हापूर: ‘कासारी’धरणात २१ टक्के पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

अविनाश सुतार

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी   मध्यम प्रकल्पात आज (दि.२८) अखेर २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  तो गतवर्षीच्या तुलनेने चार टक्का कमी आहे. पाणी पातळी खूपच कमी झाल्याने कासारी नदीकाठावरील गावांना पाणी  टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. उर्वरित पाच लघुपाटबंधारे प्रकल्पात सरासरी १५ ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून कासारी नदी पात्रात होणारा २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद केल्याने लघु प्रकल्पातही पाणीसाठा कमी आहे. गेळवडे या मुख्य धरणाची पाणीसाठा क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी म्हणजे ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी गेळवडे धरणात २४.९० टक्के पाणीसाठा होता. तो २०.७१ टक्के आहे.

धरणाची पाण्याची पातळी ६०६.२० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा १६.१४  द.ल.घ.मी (०.५७ टीएमसी) म्हणजेच २०.७१ टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी ६०७.७० मीटर तर पाणीसाठा १०.५१ दलघमी इतका होता. गतवर्षीपेक्षा धरणात चार टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यावेळी धरणात (०.६९ टीएमसी) म्हणजेच २४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

कडवी धरणात ३५ टक्के पाणीसाठा

कडवी धरणात रविवारअखेर ३५ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ५९८.४० मीटर असून पाणीसाठा २४.५५  द.ल.घ.मी (०.८७ टीएमसी) म्हणजेच ३४.८० टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी ५८८.४५ मीटर तर धरणाचा पाणीसाठा २१.८१ दलघमी इतका होता. गतवर्षीपेक्षा धरणात सहा टक्के पाणीसाठा अधिक आहे. त्यावेळी धरणात ( ०.७७ टीएमसी) म्हणजेच ३०.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरणातून १२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू असून पाणी टंचाई भासणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उत्तम मोहिते यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT