कोल्हापूर : बदल्या रखडल्या; जिल्ह्यातील 650 पोलिसांचा जीव टांगणीला! | पुढारी

कोल्हापूर : बदल्या रखडल्या; जिल्ह्यातील 650 पोलिसांचा जीव टांगणीला!

कोल्हापूर, दिलीप भिसे : पोलिस अधीक्षक, शहर, उपअधीक्षकांसह पोलिस ठाण्याला दोन आणि जिल्ह्यांत चार वर्षांचा कार्यकाळ झालेल्या बहुतांश प्रभारी अधिकार्‍यांच्या झटपट बदल्या होत असतानाच पोलिस ठाण्यात 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या 650 पोलिसांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळेना. बदली प्रक्रिया रखडल्याने पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. चोखपणे कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांसमोर मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता लागून राहिली आहे.

पोलिस ठाण्यांतर्गत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू असतानाच 2022 मधील स्थगिती आदेशामुळे ही प्रक्रिया थांबली होती. त्यानंतरही काहीकाळ अनिश्चिती होती; मात्र स्थगिती आदेश उठविण्यात आल्यानंतर एप्रिल व मे 2023 पंधरवड्यापर्यंत पोलिसांना बदल्यांचे वेध लागले होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दि. 17 ते 20 एप्रिल याकाळात जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांची शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात शनिवारपर्यंत (दि. 27 मे) पूर्तता झाली नव्हती.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभामुळे चिंता वाढली

पोलिस दलांतर्गत अधिकारी, कर्मचारी यांच्या 31 मेपर्यंत बदल्यांची शक्यता असते. कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत काही जिल्ह्यांत ही प्रक्रिया झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र यासंदर्भात अजूनही हालचाली दिसून येत नसल्याने पोलिसांची घालमेल वाढली आहे. जून 2023 पासून शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होतो आहे.

तोंडावर पावसाळा अन निवार्‍याचीही समस्या

या काळात शाळा, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आणखी काही काळ बदल्यांची प्रक्रिया रखडत गेली, तर तोंडावर पावसाळा आहे. बदलीच्या ठिकाणी कुटुंबासह स्थलांतर होत असताना निवार्‍याची समस्या सार्‍यांना सतावणारी ठरणार आहे.

आता तरी मुहूर्त मिळणार का ?

2020 मध्ये 450, तर 2021 वर्षात 300 पोलिसांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांत ही प्रक्रिया थांबली आहे. पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या पोलिसांची संख्या साडेसहाशेवर आहे. येत्या काही दिवसांत बदल्यांच्या प्रक्रियेला मुहूर्त मिळणार का, याचीच चर्चा कोल्हापूर पोलिस दलात सुरू आहे.

Back to top button