कोल्हापूर

168 वर्षांत कृष्णाकाठाला 7 महापुरांचा फटका

Shambhuraj Pachindre

जयसिंगपूर : संतोष बामणे गतवर्षी 23 जुलैला आलेल्या महापुराने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. पण त्यापूर्वीही कृष्णाकाठाने भीषण महापूर अनुभवले आहेत. गेल्या 168 वर्षांत कृष्णाकाठाला सात महापुरांचा तडाखा बसला आहे. 1853, 1856, 1914, 1962, 2005, 2019, 2021 अशा सात महाभयंकर महापुराची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे आता नुकसानभरपाई नको, महापुरावरच कायमस्वरूपी तोडगा हवा, अशी मागणी होत आहे.

1853, 1856, 1914 व 1962 या साली आलेल्या महापुराची कागदपत्रे उजेडात आली आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात ही कागदपत्रे आहेत. 18 व्या शतकात महापुराने नागरिकांची कशी दैना उडविली याचे साद्यंत वर्णन नांदणी (ता. शिरोळ) येथील रंगराव शाहीर यांनी 1856 साली केले आहे. हा दस्तऐवज मोडी लिपीत आहे. 1853 साली जुलै महिन्यात दक्षिण महाराष्ट्रात कृष्णाकाठच्या सर्वच क्षेत्रांत दमदार पाऊस पडला होता. कृष्णेच्या पाण्याने सातार्‍यापासून कर्नाटक सीमेपर्यंत काठालगतच्या गावांची धूळधाण उडविली होती. सध्याच्या शिरोळ तालुक्यात व त्या काळातील उदगाव पेठा भागात महापुराने थैमान घातले. अनेक गावांचीही धूळधाण झाली होती. अनेकांची घरे वाहून गेली तर अनेक वाडे जमीनदोस्त झाले. मागील वर्षी 23 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरातही तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

कुरुंंदवाड भागात 3 हजार घरे पडली. पेठ बुडाल्याने अन्‍नधान्य नष्ट झाले. भैरववाडी बुडाली. यावेळी कुरुंदवाडच्या राजाने लोकांना वाड्यावर आणले. तरीही पाणी कमी व्हायचे नाव घेईना आणि पुढे पाणी वाढतच राहिले. शिवाय खिद्रापूर, राजापूर, टाकळी ही गावे बुडाली. लोक नावेने जात असताना यड्डूूर-मांजरी येथे नाव वाहून गेली. पंचगंगेलाही महापूर आला. कोल्हापुरातील अनेक वाडे पडले. सर्व कचेर्‍या व नौका बंद करण्यात आल्या. वळीवडे, चिंचवाडला महापुराने विळखा घातला. शिये-भुये-शिरोलीत पाणी शिरले. इचलकरंजीला मोठा फटका बसून पिराच्या पायरीपर्यंत पाणी आले. हेरवाड, तेरवाड, शिरढोण गावेही विस्कटली. धरणगुत्तीला महापुराचा वेढा पडला. नादंणी-शिरोळ मार्ग बंद झाला आणि आता नको हा महापूर, असे म्हणत नागरिकांनी कृष्णामाईला हात जोडला, असे शाहिरांनी वर्णनात म्हटले आहे.

नांदणी : येथील रंगराव शाहीर यांनी सन 1856 साली महापुराच्या वर्णनाचा मोडी लिपीत लिहिलेला दस्तऐवज.

नांदणीच्या रंगराव शाहिराच्या 1856च्या कागदात असे आहे वर्णन…

उदगाव, कोथळी गावांतील घरांवरून पाणी वाहू लागले. कसाबसा जीव वाचवला; तर अनेकांनी जीव गमावला. कृष्णेच्या महापुराच्या विळख्यात चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, शेडशाळ, गणेशवाडी, हसूर, शिरटी ही गावे सापडली. महापुराचे पाणी औरवाड व गौरवाड या दोन्ही गावच्या मधून वाहू लागल्याने गावे विभागली. नरसोबावाडीत मनुष्य नगारखान्यावर व दुमजली घरावर जाऊन राहिले. एकमेकांना मिठी घालून रडू लागले. यावेळी पूरग्रस्तांनी श्री दत्तात्रयाकडे धावा केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT