

इचलकरंजी : विठ्ठल बिरंजे सूत आणि कापड व्यापार्यांच्या मनमानीला अक्षरशः वैतागलेल्या मलमल कापड उत्पादक यंत्रमागधारकांनी शनिवारपासून उत्पादन बंद ठेवले आहे. त्यामुळे शहरातील तीन हजार यंत्रमागांचा खडखडाट बंद झाला असून 1 हजार कामगारांना उघड्यावर येण्याची वेळ आली आहे ; तर वस्त्रोद्योगातील दररोजची 1 कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास एक दिवस शहरातील संपूर्ण यंत्रमागाचाच खडखडाट शांत होईल.
कापूस, सूत आणि कापड दरातील अनिश्चिततेच्या गर्तेत इचलकरंजी शहरासह राज्यातील यंत्रमाग व्यवसाय सापडला आहे. तोटा होत असूनही नाईलाजास्तव कारखाने सुरू ठेवले. पण आता गळ्याला आल्यामुळे वस्त्रोद्योगातील एक-एक घटक बंद पडत आहे. मलमल कापड उत्पादकांनी कारखाने शनिवारी बेमुदत बंद ठेवून पहिले पाऊल उचलले आहे.
शहरात मलमल कापड उत्पादन करणार्या कारखान्यांची संख्या उल्लेखनीय आहे. जवळपास 300 उद्योजकांकडून 3 हजार यंत्रमागावर मलमल कापडाचे उत्पादन घेतले जाते. या कापडाला राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगली मागणी आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून यंत्रमाग कारखाने सुरू केले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कारखाने बंद ठेवावे लागल्याने मोठे नुकसान झाले. मात्र निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या अपेक्षेने मलमलचे उत्पादन सुरू केले. पण सूत, कापड बाजारात गब्बर दलालांच्या तावडीत मलमल कापड उत्पादक सापडले आहेत.
सकाळी सूत खरेदी करताना कापसाचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत सुताच्या दरात भरमसाट वाढ करून कारखानदारांच्या माथी मारली जाते. तर याच सुतापासून तयार कापड बाजारात नेल्यानंतर कापडाला मागणी नसल्याचे कारण पुढे करून उघड उघड दर पाडले जात आहेत. व्यापार्यांच्या या नीतीमुळे एकंदरीत मलमल कापड उत्पादक कारखानदार आतबट्ट्यात आला आहे. व्यापार्यांच्या या धोरणाला चाप लावण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
संपूर्ण व्यवसाय व्यापार्यांच्या हातात गेलेला आहे. ते ठरवतील तो दर असे सूत्र तयार झाल्याने तोटा होत आहे. आणखी तोटा सहन करण्याची क्षमता नाही. राज्य शासनाने याबाबत निश्चित धोरण ठरविणे गरजेचे आहे.
– प्रदीप धुत्रे मलमल कापड उत्पादक
हेही वाचा