नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नारायण राणेंना उदय सामंतांचा इशारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत जशी ॲक्शन येईल तशी रिॲक्शन शिवसेनेकडून होईल, अशा शब्दात शिवसेना नेते उदय सामंत यांनी राणेंना रोखठोक शब्दात इशारा दिला.
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सामंत म्हणाले की, खरे म्हणजे केंद्रातील चार मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा राज्यात सुरू आहे. पण,कोकणातील जन आशीर्वाद यात्रा फक्त गाजत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दल कोणी आगळीक केली वा अनुद्गार काढले तर शिवसैनिक ते खपवून घेणार नाही. खरे तर जनतेचे आशीर्वाद चांगल्या कामातून मिळावे यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे, अशी खोचक टीकाही सामंत यांनी केली. शिवसेनेला कोणीही शह देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे काही गैर नाही, असे सामंत म्हणाले. या भेटी नंतर युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधले असता पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय शिवसैनिक म्हणून आमच्यासाठी बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचलं का?