वैभव नाईक 
कोकण

आम्ही शिवसेनेचेच मावळे…! मातोश्रीशी एकनिष्ठ आमदार वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत

Shambhuraj Pachindre

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच शिवसेना पक्षांशी एकनिष्ठ असलेले आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे शुक्रवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, फुलांच्या वर्षावात रॅली काढत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आवाज कोणाचा शिवसेनेचा, हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब अंगार है बाकी सब भंगार है…अशा जोरदार घोषणाबाजी देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

आम्ही मावळे शिवसेनेचेच, काळ संघर्षाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे, असे फलक आणि भगवे झेंडे घेत शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. या जल्लोषी वातावरणात आमदार वैभव नाईक यावेळी काहीसे भाऊक झाले.

राज्यात गेले चार दिवस वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. सध्या ते आसामची राजधानी गुवाहाटी येथे आहेत. त्यांच्या सोबत 40 शिवसेना आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. मातोश्रीशी जवळ असलेले अनेक शिवसेनेचे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या तंबूत गेले आहेत. असे असताना कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी मात्र, आपण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी नाईक म्हणाले, आज तुम्हा सर्वांनी माझे मोठे स्वागत केले. मात्र मी स्वागत करण्याएवढे कोणतेही मोठे काम केले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर निष्ठेने जो विश्वास दाखवला, ज्या निष्ठेने तुम्ही मला आमदार केले, त्याच निष्ठेने मी शिवसेना पक्षप्रमुख व तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कायमच तुमच्यासोबत राहणार आहे. जे आमदार बंडखोरी करून गेले ते निश्चितच पुन्हा शिवसेनेत येतील. सत्ता असो वा नसो, मी आमदार असो वा नसो मी मात्र एकनिष्ठतेने शिवसेनेसोबत सदैव राहणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले.

मुंबईहुन शुक्रवारी सकाळी नाईक हे कुडाळ येथे दाखल झाले. त्यावेळी कुडाळ व मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेना शाखा ते गांधीचौक व परत शिवसेना शाखा अशी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. आमदार नाईक यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. नाईक यांनी सर्वांना अभिवादन करीत शुभेच्छा स्वीकारल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदिसह काॅग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा आफरीन करोल, विद्याप्रसाद बांदेकर व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT