मडुरा : पूर्वी गणेशोत्सव आला की मातीच्या भिंती रंगवण्यासाठी खास माती शोधून आणली जायची आणि ती पाण्यात मिसळून तिने भिंती रंगवल्या जायच्या. आता मात्र बदलत्या काळात हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच भिंतीवर काढण्यात येणार्या निसर्ग चित्राची परंपरा ही जणू हरवत चालली आहे. परंतु मळेवाड येथील चित्रकार मदन मुरकर यांनी मात्र आपली पारंपरिक भिंती रंगावण्याची कला टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत.
पूर्वी भिंतींना रंग लावल्यानंतर जमिनीपासून दीड- दोन फुटांचा पट्टा शेणाने रंगवून मातीच्या रंगाला विरुद्ध रंगसंगती दिली जायची. मग मातीच्या भिंती चिरेबंदी झाल्या. त्यावर गिलावा आणि ऑइल पेंट आला. नंतर डिस्टंबर, प्लास्टिक आणि एचडी रंग आले. आता तर रंग जाऊन भिंतीवर फरशा आल्या. गणपतीच्या भिंतीचे तेच झाले. पूर्वी गणपतीची भिंत रंगवायची म्हणजे अंगात अमाप उत्साह संचारायचा. अनेक ठिकाणी भिंतीवर कावी कलेतून साकारलेली चित्रे असायची. चतुर्थी सणाच्या आधी दोन-चार दिवस मुले रंगीत खडूने भरून छान भिंत रंगवली जायचे.
त्यात पौराणिक कथांवर आधारित चित्रे असायची. हत्ती, घोडे, पक्षी, वेली, फुले सगळे असायचे. नंतर भिंतीवर निसर्ग चित्रे आली. गावातील चांगली कला असलेला मुलगा नाहीतर एखादा नवशिका चित्रकार अनेक घरात जाऊन चित्रे काढायचा.
बाजारात निसर्ग चित्रांची पोस्टर मिळायची. ती हुबेहूब गणपतीच्या भिंतीवर उतरण्याचा प्रयत्न केला जायचा किंवा बहुतालचा निसर्ग चित्रात उतरायचा. झाडे, वेली, फळे, घर, नदी, पक्षी, गुरे, मंदिराचा कळस सगळे भिंतीवर यायचे ते माणूस आणि निसर्ग यातील समृद्ध नाते सांगण्यासाठी. भिंतीवर दिसणारा तो निसर्ग आता हरवत चालला आहे. काळ बदलला तशा लोकांच्या आवडी ही बदलल्या आहेत.
डिजिटल युगात सुद्धा पारंपरिक कला जोपासण्याकडे आपला कल आहे. पैसे पेक्षा कला जोपासण्याचा प्रयत्न माझा असून ही कला कायम टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार.मदन मुरकर चित्रकार, मळेवाड.