दोडामार्ग : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या हलर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. वायंगणतड येथे तिलारीच्या मायनर कालव्याला मोठी गळती लागून तीन दिवसांपासून शेती, बागायतंमीध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरत आहे. विशेष म्हणजे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली, तरी तब्बल तीन दिवस उलटूनही प्रकल्पाच्या एकही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वायंगणतड येथे तिलारी प्रकल्पाचा मायनर कालवा आहे. या मायनर कालव्याला पडलेल्या गळतीमुळे परिसरातील भातशेती, बागायत आणि अन्य लागवडीच्या क्षेत्रात त्याला तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले आहे. सतत पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गळती सुरू झाल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तातडीने तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
गळती वाढत असून तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही वारंवार सांगण्यात आले. मात्र, तीन दिवस उलटूनही संबंधित विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अधिकाऱ्यांचा हलर्जीपणा
कालव्याला गळती लागल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्या असत्या, तर नुकसान टाळता आले असते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गळती वाढत गेली आणि पाणी थेट शेतीत घुसल्याने अनेक बागायती आणि पिके धोक्यात आली आहेत. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सिंचन योजनेची देखभाल वेळेत होत नसेल, तर त्याचा फटका शेतकऱ्यांनी का सहन करावा? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन
कालव्याची गळती तातडीने बंद करून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत. तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी करत मायनर खालव्याची दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.