वैभववाडी : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मौदे येथील विवाहित तरुणाचा मृतदेह अरुणा धरणाच्या वरच्या बाजूला आखवणे-अवघडाचा व्हाळ येथे आढळून आला. योगेश दत्ताराम कदम (वय 24, रा. मौदे -कदमवाडी) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास मृतदेह आढळून आला.
योगेश कदम याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. तो आई-वडिलांसोबत मौदे-कदमवाडी येथे राहत होता. तो मोलमजुरीची कामे करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारी सकाळी मजुरीच्या कामाला जातो असे सांगून तो घराबाहेर गेला. मात्र सायंकाळी तो घरी परत आला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची खबर त्याच्या भावाने वैभववाडी पोलिस ठाण्यात दिली होती.
गेले तीन दिवस त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू होती. सोमवारी सकाळी अरुणा नदीच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थ शोधत असताना अवघडाचा व्हाळ येथे त्याचा मृतदेह सापडला. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
याबाबत वैभववाडी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आल्यानंतर सहा. पोलिस निरीक्षक मनोज भोसले, उपनिरीक्षक राजन पाटील, पोलिस हवालदार रणजीत सावंत, हरीश जायभाय, दीपक कानसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.