

Market Incident Vaibhavwadi
वैभववाडी : वैभववाडी शहरात एका पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी मोटारसायकल स्वाराला मागून पुणे येथील पर्यटकांच्या कारने धडक दिली. याचा जाब विचारल्याचा राग कारमधील मद्यधुंद तरुण पर्यटकांना आला. त्यांनी या जाब विचारणार्या स्थानिक मोटारसायकलरस्वारावर हात उचलला. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी त्या गाडीतील तरुणांची चांगली धुलाई केली. यामुळे शहरात काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या युवकांना पोलीस ठाणे आणले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी 5.45 वा. च्या सुमारास घडली.
वैभववाडी शहरात सध्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. दरम्यान सायंकाळी एका पक्षाचा स्थानिक पदाधिकारी मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यांच्या मोटरसायकल मागून पुणे येथील पर्यटकांची गाडी येत होती.
या पर्यटकांच्या गाडीने स्थानिक पदाधिकार्याच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. पदाधिकार्यांने त्या चालकाला जाब विचारला. मात्र मद्यधुंद युवक या पदाधिकार्याच्या अंगावर गेले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. हा प्रकार पाहून नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. वस्तुस्थिती समजताच स्थानिक नागरिकांनी या तरूणांना चांगला चोप दिला, तसेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्या युवकांना पोलिस ठाण्यात आणले. झाल्या प्रकाराबाबत त्या युवकांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.