

वैभववाडी : करूळ घाटात सोमवारी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी एनडीआरएफ च्या टीमसह करूळ व भुईबावडा या दोन्हीही घाटाची पहाणी केली. त्यांनी घाटातील सुरक्षिततेचा आढावा घेतला. व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना सूचना केल्या.
त्यांच्यासमवेत कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरचे पवन पाटील, सा. बां. चे उपाभियंता श्री.जोशी, शुभम दूंडीये, तसेच एनडीआरएफ टीमचे निरीक्षक श्री. यादव व 14 जवानांची टीम होती.
चालू वर्षी संपूर्ण करूळ घाटाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणानंतर हा पहिलाच पावसाळा आहे. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाट मार्गातील कोसळणार्या दरडीचा धोका कायम आहे. तसेच भुईबावडा घाटात सुद्धा दरडी कोसळण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी दोन्हीही घाटाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना रस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे.
संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळी बसविण्याच्या सूचना केली. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रस्त्यावर माती आली आहे. त्याठिकाणी रस्ता स्वच्छ करून घ्या. पावसाळ्यात दरड कोसळल्यास तातडीने दरड हाताविण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर ठेवा. जेणेकरून वाहतूकीवर परिणाम होणार नाही. अशा सूचना श्री. पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्व. बांधकामच्या अधिकार्यांना दिल्या.