Malvan Municipal Council 
सिंधुदुर्ग

Malvan Municipal Council | मालवण पालिकेच्या कारभाराविरोधात वैभव नाईक आक्रमक

Malvan Municipal Council | मत्स्यालयाचा 5 कोटींचा निधी परत गेल्याने संताप; शहरातील विविध प्रश्नांवर वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा

मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय उदासीनता आणि मत्स्यालयासाठी आलेला निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून माजी आ. वैभव नाईक यांनी बुधवारी सकाळी मालवण नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना धारेवर धरले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरासाठी आणलेला सुमारे ५ कोटींचा निधी व्याजासह परत जाणे हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी सन २०२५ मध्ये हा निधी व्याजासह परत गेला. वैभव नाईक यांनी सांगितले की, "मत्स्यालयासाठी विशेष बाब म्हणून आम्ही ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी सन २०२५ मध्ये हा निधी व्याजासह परत गेला आहे.

वेळेत पत्रव्यवहार झाला असता, तर आज शहरात एक भव्य मत्स्यालय उभे राहिले असते. आता पालिकेकडे जिल्हा नियोजनाशिवाय अन्य कोणताही मोठा निधी शिल्लक नाही." वैभव नाईक यांनी बुधवारी येथील पालिकेस भेट देत शहरातील विविध समस्यांसंदर्भात मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याशी चर्चा केली.

महेंद्र म्हाडगुत यांनी मासळी मंडईतील गाळे पडून आहेत. त्यांचा वापर करून पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे सांगितले. पालिकेच्या पाकिंगचा वापर होत नाही कारण त्याच्या पुढील जागेत अतिक्रमणे आहेत. पार्कर्कंगसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी असे तपस्वी यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या ज्या ज्या जागा आहेत त्या पालिकेने ताब्यात घ्याव्यात असे मयेकर पूजा करलकर यांनी सांगितले. भुयारी गटार योजनेचे काम अपूर्ण असल्याने संबंधित ठेकेदाराची नगरसेवकांसोबत बैठक लावून योजनेचे काम पूर्ण कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले. पावसाळा जवळ आल्याने शहरातील गटारे, व्हाळ्या साफसफाईचे काम केव्हा सुरू होणार? अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर टेंडर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बाजारपेठेत पालिकेच्या जागेत अतिक्रमण करत हॉटेल उघडण्यात आले आहे. त्याची ड्रेनेज व्यवस्था काय आहे याची पाहणी स्वच्छता निरीक्षकांनी केली काय? असा प्रश्न म्हाडगुत यांनी करत त्यावर पालिका प्रशासन कोणती कारवाई करणार? अशी विचारणा केली. गवंडीवाडा येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.

मात्र त्याचा वापर होत नाही. धामापूर नळपाणी योजनेचे कनेक्शन या टाकीला दिल्यास गवंडीवाडा, आडवण भागास मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होऊ शकतो असे मंदार ओरसकर यांनी सांगितले. कचरा संकलन हे घरोघरी जात गोळा करायचा असताना स्वच्छता कामगार गल्ल्यांमध्ये, घरोघरी जात नसल्याची तक्रार तपस्वी मयेकर यांनी केली.

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, गौरी सावंत, हेमंत मोंडकर, महेश जावकर, पूजा करलकर, उमेश चव्हाण यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पालिकेच्या विविध जागा ताब्यात घेऊन त्यांचा शहराच्या विकासासाठी वापर करावा, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT