

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या प्रस्तावित 'शक्तिपीठ' महामार्गाला माझा विरोध असून, हा मार्ग कोकणावर अन्याय करणारा आहे, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे, असे आ. दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. केसरकर म्हणाले, सध्या ज्या पद्धतीने 'शक्तिपीठ' महामार्गाचे काम सुरू आहे, त्याला आपला विरोध आहे. मार्गाचा प्रस्तावित आराखडा कोकणावर अन्याय करणारा आहे. कोकणात सुंदर समुद्र किनारे, छान छान बंदरे असताना हा मार्ग बाहेरुन गेल्यास त्याचा कोकणाला काहीच 2012 फायदा होणार नाही.
आतापर्यंत कोकणावर एक प्रकारे अन्यायच झाला आहे. 'शक्तिपीठ' महामार्ग आजरा येथून रेडी बंदराला गेला पाहिजे, तसेच तो सहा पदरीऐवजी चार पदरी मार्ग करून चंदगड, दोडामार्ग, आंबोली, पारपोली, केसरी-फणसवडे असा बोगदा काढून मार्ग रेडी बंदराला कनेक्ट करावा, अशी आपली मागणी आहे.
याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे तसेच चंदगडचे आमदार यांच्याशी चर्चा करणार आहे, असे केसरकर म्हणाले. रखडलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात राजघराण्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी दोन्ही प्रतिनिधींना बोलावून बैठक घेतली जाईल.
यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांशी आपली बोलणी झाली आहे. सावंतवाडी रुग्णालयाला फिजिशीयन मिळाला आहे तर वेंगुर्ला, दोडामार्ग, शिरोडा या रुग्णालयांना काही तज्ज्ञ डॉक्टर मिळावेत, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे आ. केसरकर यांनी स्पष्ट केले.