कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी विचारांचे कार्यकर्ते होते, मात्र भाजपने पैशांची आमिषे देऊन कार्यकर्ते मिळविले आणि पक्ष वाढविला. आता त्या कार्यकर्त्यांना भाजपपेक्षा जास्त आमिषे मिळाल्याने ते दुसर्या पक्षात जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जे ‘आपण पेरले तेच उगवले आहे’, असा टोला ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आ. वैभव नाईक यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांना लगावला आहे. जिल्ह्यात भाजपचे नेतृृत्व प्रभाकर सावंत किंवा आ.रवींद्र चव्हाण करीत नाहीत तर राणे कुटुंब करीते, हे पुन्हा सिद्ध झाल्याची टीका त्यांनी केली.
उद्या सत्ता बदलली की, राणे सांगतील किंवा राणे जातील त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातील आणि प्रभाकर सावंत आपल्या सारखे मोजकेच कार्यकर्ते भाजपमध्ये राहतील. त्यामुळे प्रभाकर सावंत यांना माझी विनंती आहे,अजूनही वेळ गेलेली नाही, मतदारांची रसद पुरविण्याचे बंद करा, जनतेची कामे करा आणि विचारांद्वारे कार्यकर्ते घडवा, असा सल्ला वैभव नाईक यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वैभव नाईक यांनी म्हटले आहे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार केली आहे. पैशांचे आमिष देऊन भाजप पदाधिकार्यांचा शिंदे गटात प्रवेश घेतला जात असल्याने प्रभाकर सावंत यांच्या मनात खंत निर्माण झाली आहे.
याआधी भाजपचे नेते माजी आ. अॅड. अजित गोगटे, सदा ओगले, अभय सावंत, अतुल काळसेकर, श्री.हडकर हे एका विशिष्ट विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केले आहे. परंतु गेल्या ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना रसद पुरविली त्यामुळे त्यांना भाजपा वाढली असे वाटले. मात्र भाजपाला आलेली ती सूज होती. आता तुमच्या कार्यकर्त्यांना आमिषे देऊन फोडले जात आहेत. अमिषाला भुलून तुमचे कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत, म्हणजेच ते तुमचे कार्यकर्ते नव्हते. त्यावेळी तुमच्या नेत्यांनी त्यांना अशीच आमिषे देऊन भाजपात घेतले होते.
आ. रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशापद्धतीने भाजपा वाढविली आणि ती कशापद्धतीने एका वर्षात कोलमडत आहे हे सिंधुदुर्ग वासीय बघत आहेत. सिंधुदुर्गात भाजपचे खासदार, भाजपचे पालकमंत्री, राज्यात भाजपचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान भाजपचे आहेत असे असताना देखील पैशांच्या आमिषांना भुलून भाजप पदाधिकारी पक्ष सोडत आहेत त्यामुळे जिल्हाध्यक्षांची हतबलता झाली आहे. त्यांची ही हतबलता सर्वकाही सांगून जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपने ‘जे आपण पेरले तेच उगवले’ असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.