महापालिकेपाठोपाठ जि.प.तही बिनविरोधचे राजकारण pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg ZP Election : महापालिकेपाठोपाठ जि.प.तही बिनविरोधचे राजकारण

जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 6 सदस्य विजयी

पुढारी वृत्तसेवा

ओरोस ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी 24 तारखेला अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे चार जिल्हा परिषद उमेदवार आणि शिवसेनेचा एक जिल्हा परिषद उमेदवार असे 5 उमेदवार जिल्हा परिषद सदस्यपदी बिनविरोध निवडून आले आहेत. तर जिल्हाभरात भाजपचे पंचायत समित्यांचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

भाजप आणि शिवसेना युतीचा बिनविरोध विजयाचा हा धडाका सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या 27 जानेवारी या तारखेपर्यंत आणखी अनेक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता असून महायुतीच्या बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी 24 जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा दुसरा दिवस होता. छाननीमध्ये ठाकरे सेनेच्या काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने महायुतीच्या काही जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 23 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. हा आकडा वाढत जावून 24 तारखेला शनिवारी एकूण 11 वर पोहोचला आहे.

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण 5 जागा महायुतीकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. कणकवली तालुक्यातील खारेपाटण जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार प्राची ईस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या विरुद्ध असलेल्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कणकवली तालुक्यातील जानवली गटातील शिवसेनेच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातही ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता.

हा अर्ज शनिवारी मागे घेतल्याने रुहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. देवगड तालुक्यातील पडेल जिल्हा परिषद गटातील सुयोगी रवींद्र घाडी या भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या असून त्याला लागून असलेल्या बापर्डे जिल्हा परिषद गटातील अवनी अमोल तेली या भाजपच्याच उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात बिनविरोधचा धडाका सुरू असतानाच सावंतवाडी तालुक्यातील बांदा गटातील प्रमोद कामत हेही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. प्रमोद कामत हे यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले होते आणि त्यांनी आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून काम केले होते.

जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समिती गणातील अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्याने बिनविरोधचा सिलसिला सुरू झाला आहे. आतापर्यंत देवगड तालुक्यातील बापर्डे पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार संजना लाड, नाडण पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार गणेश राणे आणि पडेल गणातील भाजपचे उमेदवार अंकुश ठुकरुल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

कणकवली पंचायत समितीमधील बिडवाडी पंचायत समिती गणातील संजना राणे या भाजपच्या आणि वरवडे पं.स. गणातील भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. यापूर्वी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गणातील साधना सुधीर नकाशे या भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

ठाकरे शिवसेनेकडून आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काही अर्ज छाननीमध्ये बाद झाले होते आणि ज्यांचे अर्ज वैध ठरले आहेत असे काही उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. आता 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु तत्पूर्वी रविवारी 25 तारीख आणि सोमवारी 26 तारीख हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. या काळात महायुतीचे बिनविरोध मिशन सुरू राहण्याची शक्यता आहे.

या मिशनला यश येऊन सोमवारी आणखी काही उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. 23 तारखेला शुक्रवारी 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते आणि 24 तारखेला 24 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या एकूण 139 जागांवर अद्याप 589 उमेदवार रिंगणात आहेत. आता मंगळवारी 27 तारखेला यातील किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासात पहिली घटना

भाजप आणि शिवसेना महायुतीसमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी खूपच बॅकफूटवर गेली आहे. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी उरलेल्या दिवसात महायुतीच्या उमेदवारांसमोर कशी लढत देणार याचीही उत्सुकता आहे. आजवरच्या राजकीय इतिहासात असे पहिल्यांदा घडले आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. आजवर जिल्हा परिषदेच्या सहा निवडणुका झाल्या असून सध्याची सातवी निवडणूक या बिनविरोधच्या धडाक्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.

  • आतापर्यंत 29 उमेदवारी अर्ज मागे

  • सहाही विजयी सदस्य भाजपचे

  • जिल्हा परिषदेचे 4 बिनविरोध सदस्य भाजपचे आणि 1 शिवसेनेचा

  • शेवटच्या दिवशी 27 तारखेला आणखी अर्ज मागे घेण्याची शक्यता

  • बिनविरोध निवडून येणाऱ्यांचा आकडा वाढत जाईल असा अंदाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT