

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर बायोमायनिंग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यात सुमारे 9 लाख मेट्रिक टन कचऱ्याचा ढीग बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करून संपूर्ण क्षेत्र मोकळे करण्याचा महत्त्वाकांक्षी कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. तसेच या कचऱ्याचे प्रमाण पाहता अतिरिक्त मशिनरी, तसेच मनुष्यबळाच्या माध्यमातून कामाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमवेत कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगसह उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील महापालिकेच्या ओला/सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी केली. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कोव्हीड काळातच कचरा टाकणे बंद करण्यात आले असून बायोमायनिंग पद्धतीच्या माध्यमातून हा कचऱ्याचा डोंगर रिकामा करण्यात येत आहे. या कामातून आतापर्यंत हजारो मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यश आले आहे.
या प्रक्रियेतून तयार होणारे सिमेंट कारखान्यांना पुरविण्यात येत आहे. शिवाय चाळून प्राप्त झालेली माती महापालिकेच्या प्रस्तावित नागरी प्रकल्पांच्या लँडफिलिंगसाठी वापरण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर त्या ठिकाणाहून दुर्गाडी ते बारावे असा प्रस्तावित रिंग रोडचा टप्पा पूर्ण करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
आयुक्त अभिनव गोयल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता जयवंत विश्वास यांच्यासह वेगवेगळ्या प्रकल्पांचे ठेकेदार उपस्थित होते. प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, पुढील 6 ते 8 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कामाचा वेग वाढावा यासाठी अधिक मशिनरी आणि मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उरलेली मोकळी जागा सिटी ब्युटिफिकेशन, उद्याने (पार्क) किंवा नागरिकांसाठी इतर सार्वजनिक सुविधाही विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
डम्पिंगग्राऊंडची ओळख पुसणार
कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्येक ठिकाणच्या प्रक्रियेची सखोल माहिती उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडून जाणून घेत प्रकल्पांची कार्यक्षमता आणखी वाढविण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना केल्या. आता डम्पिंग ग्राऊंड ही ओळख कायमची पुसली जाऊन या ठिकाणी भव्य असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात डम्पिंग ग्राऊंड निर्माण होणार नाही, या दृष्टीने नियोजन आहे.
कचरा नव्हे... हे तर सोने
बारावे प्रकल्पाची क्षमता 200 टन इतकी असून नागरिकांकडून कचरा वर्गीकरण वाढले असल्याने 150 टन प्रतिदिन कचरा याठिकाणी येत असून आयुक्तांनी विशेष कौतुक केले. तसेच हा कचरा नसून ते सोने आहे. याठिकाणी येणाऱ्या कचऱ्यातून निघणारे रिफ्युज फ्युएल हे सिमेंट, तसेच प्लॅस्टिक हे फॅक्टऱ्यांना देण्यात येत आहे. आपण आपले शहर तर सुंदर ठेवण्यासोबतच पर्यावरण रक्षणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहोत.