पावशी : कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मंत्री उदय सामंत. बाजूला मंत्री भरत गोगावले, आ.दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, व अन्य.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Kudal Political News | आमचे दोन आमदार; 70 टक्के जागा मागा!

Uday Samant Statement | मंत्री उदय सामंत यांचे शिवसैनिकांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असून 1 नंबरचा पक्ष आहे. भविष्यातही ताकद कायम ठेवण्यासाठी काम करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकिट वाटपाचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. या जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून आमदारांची संख्या लक्षात घेता 70 टक्के पासून मागणी सुरू झाली पाहीजे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रयेक गावात 100 टक्के शिवसेना झाली पाहीजे. यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा शनिवारी सायंकाळी पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात झाला. रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ.नीलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब, जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते व नीता कविटकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, बबन शिंदे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस मंडल तालुकाप्रमुख दीपक नारकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, कुडाळ शहरप्रमुख ओंकार तेली, रूपेश पावसकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर आदींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना.सामंत म्हणाले, या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद फार मोठी आहे. कार्यकर्ते म्हणतात आगामी निवडणुकीत 60 टक्के जागा शिवसेनेला मिळाल्या पाहीजेत. पण जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद पाहता 60 टक्के कशाला 80 टक्के का नको?. पण त्यासाठी 100 टक्क्यांची ताकद गावागावात निर्माण करावी लागेल. तिकिट वाटप करण्याचा अधिकार ना मला किवा ना गोगावलेंना. त्याबाबतचे सर्व निर्णय शिंदे स्वतः घेतील. पदाधिकार्‍यांशी चर्चा करूनच ते योग्य निर्णय घेतील. ना.सामंत म्हणाले, नीलेशजी न.पं. निवडणुकीबाबत आ.केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्र बसूया. तुम्ही सांगाल महायुतीत निवडणूका लढू तर महायुतीत लढवू आणि स्वबळावर लढवू सांगाल तर स्वबळावर लढवू. पण हे फक्त न. पं. निवडणुकांबाबतच असेल. जि.प. आणि पं. स. निवडणुकीबाबत वेगळी स्ट्रॅटेजी असेल.

निधी वाटपाबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणारः ना. सामंत

राज्याच्या समन्वय समितीचा आपण सदस्य आहे. जिथे महायुतीचे आमदार आहेत तेथे समित्या करताना 60 टक्के सदस्य हे त्या आमदारांचे असतील, जिल्हा नियोजनाचा निधी हा 48 टक्के भाजप, 29 टक्के शिवसेना आणि 22 टक्के एनसीपीला वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात समन्वय समितीने घेतला आहे. निधीचे वाटप करताना गाभा आणि बिगर भागा लक्षात घेता 30 टक्के निधी हा पालकमंत्री निर्णय घेऊन उर्वरित निधी समान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंशी चर्चा करून अशाप्रकारे निधी वाटपाची विनंती आपण करणार आहे. शत प्रतिशत पक्ष करण्याचा नारा काहींनी दिला आहे, पण आम्हालाही आमचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.

निवडणुकांसाठी सर्व ताकद पुरवूः ना. भरत गोगावले

ना.गोगावले म्हणाले,केंद्र आणि राज्यात महायुती सरकार आहे. पण आज कोकणात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना एक नंबरला आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या तुम्हा कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. आता गाफिल राहू नका. निवडणूका जिंकण्यासाठी कामाला सुरुवात करा. तुम्हाला लागेल ती ताकद, लागेल ते सहकार्य आम्ही करू.

जिल्ह्यात युती धर्म पाळलाच जाईलः आ. केसरकर

आ. केसरकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या जिंकण्यासाठी पक्षाचे मुख्य नेते शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीच आहे. जिल्ह्यात युती धर्म पाळलाच जाईल. युती बळकट राहिलीच पाहीजे पण त्यासोबतच आपली शिवसेनेची संघटनाही गावागावात बळकट झाली पाहीजे. महायुतीच्या माध्यमातून महायुतीची ताकद मजबुत राहीली पाहीजे अशी खा.राणेेंचीही इच्छा आहे. आपण आता आठवड्यातून चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देणार आहे.

आमची स्पर्धा केवळ विकासाशी

आ.नीलेश राणे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले या शिवसेनेच्या दोन मंत्र्यावर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आज जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. अनेक प्रवेश होत आहेत. शिंदे यांच्या प्रेमापोटी हे होत आहे. अनेक जण वेटींग वर आहेत. विरोधक आता राहिलेच नाहीत. आमची स्पर्धा कोणाशी नाही. आमची स्पर्धा विकास कामांसोबत आहे. आगामी निवडणुकांत शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा जो आनंद एकनाथ शिंदे यांना होईल तो आनंद आपल्याला बघायचा आहे. .यावेळी कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. निवेदन दादा साईल यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT