काळसे : शेतकरी व विद्यार्थ्यांना फळझाडे रोप वितरित प्रसंगी राजीव पवार. सोबत रविशंकर डोकोजू, गजानन कांदळगावकर, सौ.विशाखा काळसेकर, सचिन मदने, नील जोसेफ आदी मान्यवर. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Tree Plantation Sindhudurg | धरणीमातेच्या कृतज्ञतेचा संकल्प; 50 हजार वृक्षलागवडीचा प्रकल्प

सिंधुदुर्गात 50 हजार वृक्षलागवड करणार; मालवण-काळसे येथे उपक्रमाचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

मालवण : कोकणच्या हिरव्यागार निसर्गाला आणखी समृद्ध करण्यासाठी आणि धरणीमातेचे ऋण फेडण्यासाठी एका दानशूर व्यक्तीने उचललेले पाऊल सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक ‘हिरवी पहाट’ घेऊन आले आहे. बंगळूर येथील प्रसिद्ध ‘डोकोजू फाऊंडेशन’चे संस्थापक आणि रोटरीला 100 कोटी रुपयांचे महादान देणारे रविशंकर डोकोजू यांनी ‘डोकोजू धन्यवाद’ या अनोख्या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल 50 हजार वृक्ष लावण्याचा महासंकल्प केला आहे. मालवण तालुक्यातील काळसे येथील माऊली मंदिरात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना फळझाडांची रोपे देऊन या ऐतिहासिक उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

‘डोकोजू फाऊंडेशन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ कुडाळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलताना रविशंकर डोकोजू यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, ही भूमी आपल्याला सर्व काही देते. तिचे ऋण व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपण नसून, निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. येत्या 5 वर्षांत सिंधुदुर्गातील गावोगावी 50 हजार झाडे लावून ती जगवण्याचा आमचा ध्यास आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाला रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, डोकोजू फाऊंडेशनचे नील जोसेफ, गजानन कांदळगावकर, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, रोटरी क्लब सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, दीपक आळवे, प्रथमेश सावंत आणि ‘वयंम् फॉरेस्ट’चे प्रथमेश काळसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या दौर्‍यादरम्यान रविशंकर डोकोजू यांनी धामापूर येथील प्रसिद्ध ‘सेमंथक’ संस्थेला सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांनी ‘सेमंथक’चे संस्थापक मोहमद शेख यांच्याकडून कोकणातील प्राचीन जीवनशैली आणि संस्कृतीची माहिती घेतली व संस्थेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. काळसे सरपंच विशाखा काळसेकर यांनी हा उपक्रम शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत डोकोजू आणि रोटरी क्लबचे आभार मानले. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाला नवी संजीवनी मिळणार असून, शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले, तर आभार राजीव पवार यांनी मानले.

शंभर कोटींचे दान आणि निसर्गसेवेचा महायज्ञ!

या उपक्रमाची माहिती देताना गजानन कांदळगावकर यांनी रविशंकर डोकोजू यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, रविशंकर डोकोजू यांनी केवळ ‘रोटरी फाऊंडेशन’ला 100 कोटी रुपयांचे दान देऊन नवा आदर्श निर्माण केला नाही, तर त्यांनी गोवा आणि सिंधुदुर्ग मिळून 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे हे कार्य केवळ पर्यावरण सेवा नसून, तो एक महायज्ञ आहे, ज्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ त्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.

उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये

धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.

सिंधुदुर्गातील पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे.

शेतकर्‍यांच्या उत्पन्नात फळझाडांच्या माध्यमातून वाढ करणे.

तरुण पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे.

एक शाश्वत हरित मॉडेल तयार करणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT