आचरा : अरबी समुद्राला पौर्णिमेच्या दिवशी आलेल्या उधाणाचा फटका तोंडवळी- तळाशील किनारपट्टीला बसला होता. बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील किनार्यावरील वस्तीला धोका निर्माण झाला. यावर तातडीने उपाययोजना म्हणून आ. नीलेश राणे, व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने बंधारा घालण्याचे काम हाती घेतले होते. दरम्यान, आ. नीलेश राणे यांनी गुरुवारी तळाशील भागाला भेट देत किनारपट्टीची पाहणी केली. तळाशील किनारपट्टी भक्कम बंधार्याने सुरक्षित केली जाणार असून 800 मीटर व 500 मीटरचा दुसरा टप्पा असणार्या बंधार्यांसाठी 13 कोटी रुपये मंजूर असून, येणार्या मे महिन्यापर्यंत बंधारा पूर्ण केला जाणार असल्याची ग्वाही आ. राणे यांनी दिली.
शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, दीपक पाटकर, दादा साहिल, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, तोंडवळी माजी सरपंच जयहरी कोचरेकर, चेतना फायबरचे संजय तारी, ग्रामपंचायत सदस्य भूपाळ मालंडकर, केशर जुवाटकर, संजय तारी, नंदकिशोर कोचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर आदींसह तळाशील ग्रामस्थ उपस्थित होते.
आता परिस्थिती बदलली आहे. आमचे सरकार आहे कोणत्याही अडचणी आल्या त्या दूर सारून विकास साधला जाणार असल्याची ग्वाही आ. राणे यांनी ग्रामस्थांना दिली. तळाशीलचा भूभाग वाचला असेल तर तो राणेंमुळेच असे उद्गार ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच जयहरी कोचरेकर यांनी काढले. गावावर प्रसंग ओढवला असताना तळाशील येथे दत्ता सामंत हे ठाण मांडून होते. यंत्रणा राबवत तळाशील सुरक्षित करत होते, असे सांगत दत्ता सामंत यांचेही ग्रामस्थांच्या वतीने कोचरेकर यांनी आभार मानले.
आ. नीलेश राणे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, मागील वेळेला तळाशील बंधारा व्हावा म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मी आमदार नसतानाही त्यावेळी ग्रामस्थांची भेट घेतली होती व बंधार्यांसाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले होते. त्याची कार्यवाही पण चालू केली. त्यावेळी राज्यसभा खासदार असलेले नारायण राणे यांच्या माध्यमातून 10 कोटींचा खासदार निधी या बंधार्यांसाठी देण्याचे नियोजन केले होते. परंतु तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अनेक कारणे देत तो निधी पोहोचू दिला नाही. केवळ राणेंना श्रेय मिळेल म्हणून हा निधी रोखण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप आ. नीलेश राणे यांनी यावेळी केला.