

आचरा : पळसंब -गावठणवाडी येथील स्नेहलता सतीश परब यांना घरालगतच्या नाल्या जवळ सापडून आलेला पक्षी हा मास्कड बुबी असल्याची माहिती आचरा येथील पक्षीमित्र डॉ. मगदूम यांनी दिली. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी वनविभागाशी संपर्क साधल्या नंतर त्याला अधिक सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
स्नेहलता परब यांना अपरीचीत पक्षी दिसल्याने त्यांनी पक्ष्याला सुरक्षित जागेत ठेवत माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना फोनद्वारे कल्पना दिली. श्री. गोलतकर यांनी वनरक्षक लक्ष्मण आमले यांना पाचारण करत सदर पक्षी त्यांच्या ताब्यात दिला. पक्षीमित्र डॉ. मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मास्कड बॉबी प्रजज्ञातीचा आहे. (Masked Boomy Juvenile) असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हे पक्षी वादळी परिस्थितीत भरकटतात. हा समुद्री पक्षी आहे. त्याची पूर्ण वाढ झाली नसून बॉबी प्रजातीतील हा सर्वात मोठा पक्षी आहे. ते पाण्यावर उडत असताना अचानक वेगाने खाली झेप घेतात, यामुळे मासे गोंधळून जातात आणि सहज पकडले जातात. या प्रकारे शिकार करण्याला प्लंज डायविंग (Plunge Diving) म्हणतात अशी माहिती दिली.
वनरक्षक आमले यांनी सदर पक्षी हा पान पक्षी असल्याने त्याला समुद्रामार्गे सुखरूप पोहोचवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करणार असून योग्य ती त्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. देवस्थान मानकरी योगेश कापडी, रमेश परब, प्रमोद सावंत, पप्पू सावंत, दादा पुजारे, शुभांगी पुजारे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.