दोडामार्ग : तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. यावेळी धरणाच्या सॅडल डॅम (दगडी खळग्यातील धरण) येथील दरवाजातून विसर्ग होणार्या पाण्याला केशरी, सफेद व हिरव्या रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवल्याने एक मनमोहक द़ृश्य दिसत आहे.
भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेश देखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करत आहेत. धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथील आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तिलारी पाटबंधारे प्रकल्प विभागाने भारतीय तिरंग्याची आरास सजविली आहे.
दगडी खळ्यातील धरण (सॅडल डॅम) येथे धरणाचे चार दरवाजे आहेत. पैकी तीन दरवाजांवर प्रत्येकी केशरी, सफेद व हिरव्या रंगाची विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी धरणातून बाहेर पडणार्या पाण्याला राष्ट्रध्वजाच्या रंगाप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले असून हे द़ृश्य अतिशय मनमोहक दिसत आहे.