दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे, जिल्ह्याचे मुख्य आशास्थान असलेले तिलारी धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बुधवारी दुपारनंतर धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले असून, तिलारी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक होत होती. मंगळवारी सकाळी 105.08 मीटरवर असलेली पाणी पातळी बुधवारी सकाळीच 106.10 मीटरवर पोहोचली होती. दुपारी 2:50 च्या सुमारास धरणाने 106.70 मीटरची सांडवा पातळी ओलांडताच, प्रशासनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 2:50 वा.च्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते.
धरणातून बाहेर पडलेले पाणी पुच्छ कालव्याद्वारे थेट तिलारी नदीत मिसळत आहे. त्यातच तेरवण मेढे आणि उन्नैयी बंधार्यांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणार्या नागरिकांनी आणि शेतकर्यांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी केले आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला मुसळधार पाऊस.
धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू.
तिलारी नदीच्या पातळीत वाढ, प्रशासनाकडून हाय-अलर्ट