दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाची पाणी पातळी 113.20 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरण आता 100 टक्के भरले आहे. वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या द़ृष्टीने धरणाचे दरवाजे उघडले असून, धरणातून सध्या 19.94 घनमीटर प्रतिसेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, तेरवण मेढे येथील उन्नैयी बंधार्यातूनदेखील 16.84 घनमीटर प्रतिसेकंद इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही स्रोतांमधून निघणारे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. सलग दुसर्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. तालुक्यासह तिलारी घाट परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून सर्व पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिलारी प्रकल्प विभागाकडून नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहे की, नदीकाठच्या भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच अनावश्यकपणे नदी परिसरात जाणे टाळावे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत नदीचा प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे दोडामार्ग शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समोरील गटारे तुंबल्याने दोडामार्ग- वीजघर राज्य मार्गावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे नित्याचेच बनले असून या पाण्यातून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय समोरून येणार्या वाहनांना बाजू देतानाही अनेक अडचणी येत आहेत.