कणकवली : रेल्वे पोलिस अधिकारी राजेश सुरवाडे यांना जाब विचारताना माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर सोबत सुशांत नाईक, कन्हैया पारकर व ग्रामस्थ. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Railway Police Office Protest | रेल्वे पोलिस कार्यालयावर ठाकरे शिवसेनेची धडक

पिंगुळी रेल्वे रुळ चोरीप्रकरणात विचारला रेल्वे पोलिसांना जाब

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पिंगुळी येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळांची चोरी करून ते रूळ पिंगुळी- देऊळवाडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठविताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रुळ काढून ते गायब करण्यात आले. याबाबत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांना याची माहिती असूनही संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत, असा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंगुळी ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयात धडक दिली. यावेळी आरपीएफचे पोलिस निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारला.

यावेळी या घटनेची तक्रार देणार्‍या दीपक राऊळ यांनाच राजेश सुरवाडे यांनी उलट सुलट प्रश्न विचारल्याने वैभव नाईक यांनी आक्रमक होत हीच तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का दाखवली नाही? ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही? असा संतप्त सवाल केला. ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ, चेतन राणे, दीपक धुरी, केतन शिरोडकर, नामदेव पिंगुळकर, सचिन ठाकूर, साज खान, रामा पिंगुळकर, संतोष सावंत आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

ग्रामस्थ व शिवसैनिकांनी रेल्वे रुळाची चोरी करणार्‍यांचा आणि त्यांना पाठिशी घालणार्‍या रेल्वे पोलिसांचा निषेध असो, अशी जोरदार घोषणाबाजी केली. स्मशानभूमीला रेल्वे रुळाचा वापर करण्यात आल्याचा 2 जुलैचा जीपीएस मॅपद्वारे काढलेला फोटोही वैभव नाईक यांनी श्री. सुरवाडे यांना दाखविला. त्यावेळी श्री. सुरवाडे यांनी सुरुवातीला आपल्याकडे कोणाची तक्रार आली नाही, असे सांगितले पण नंतर कोकण रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता संतोष कदम यांच्याकडे पिंगुळी ग्रामस्थांनी 20 जूलैला तक्रार केली होती. त्यानुसार आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, हे मान्य केले. मात्र, तेथे काहीही दिसून आले नाही, असे आरपीएफचे निरीक्षक श्री. सुरवाडे यांनी सांगितले. दरम्यान सदर रुळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवलेले होते, ते रूळ लाला नामक भंगार व्यवसायिकाने कापून संबंधित सरपंचाच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे या भंगार व्यवसायिकाची चौकशी करा, अशी मागणी परशुराम उपरकर व ग्रामस्थांनी केली.

अखेरीस ग्रामस्थांकडून फोन नंबर घेऊन श्री. सुरवाडे यांनी भंगार व्यावसायिक लाला याला फोन करून विचारणा केली असता रूळ आपणच कापून दिल्याचे त्याने मान्य केले. त्यामुळे श्री.सुरवाडे यांनी त्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत आरपीएफच्या कणकवली कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. भंगार व्यावसायिकाची कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासनही सुरवाडे यांनी आंदोलकांना दिले. या घटनेची कसून चौकशी व्हायला हवी, रेल्वेच्या साहित्याची विनापरवाना उचल करून त्याचा वापर स्मशानभूमीसाठी करणे ही गंभीर बाब असल्याचे परशुराम उपरकर, वैभव नाईक यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

यावेळी वैभव नाईक व परशुराम उपरकर यांनी आरपीएफच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही मोबाईलद्वारे संपर्क साधत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि दोषींवर कारवाई न झाल्यास आठ दिवसांनी शेकडोंच्या संख्येने पुन्हा एकदा कणकवली आरपीएफ कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT