कणकवली ः महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर ठाकलेले असताना कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून दोन्ही शिवसेनेमध्ये युती करण्याच्या घडामोडी सुरू आहेत. कणकवलीतील या राजकीय खेळीची दखल घेत ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना रविवारी तातडीने ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याविषयीचा निर्णय सोमवारी देण्यात येईल, असे श्री. ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.
शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे रणकंदन निर्माण झाले. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात मोठे राजकीय वैर निर्माण झाले. गेल्या काही वर्षांत यातून अनेक राजकीय घडामोडी निर्माण झाल्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर युती करू नका, असा आदेश वजा सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सूचनेला तास उलटत नाहीत तोपर्यंत कणकवली न.पं. निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी ‘शहर विकास आघाडी’ च्या माध्यमातून एकत्र येत भाजप विरोधात लढण्याच्या हालचाली सुरु करत असल्याची बातमी प्रसिध्द झाली.
या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे शिवसेनेच्या जिल्ह्यातील विशेषतः कणकवलीतील प्रमूख नेत्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आलें. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वतः जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. माजी खा. विनायक राऊत, माजी आ. वैभव नाईक तसेच ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याचे समजते.
कणकवलीतील यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये मातोश्रीवरून राणे विरोधकांना बळ दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे कणकवली न.पं. निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत भाजप म्हणजेच राणेंना लक्ष करताना शहर विकास आघाडीच्या शिंदे सेनेसोबतच्या राजकीय खेळीला हिरवा कंदील मातोश्रीवरून दिला जाणार काय? याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कणकवलीत अशी युती झाल्यास त्याचे थेट परिणाम रत्नागिरी-सिंधुदुर्गतील महायुतीवरही होणार आहेत.
कणकवलीतील दोन्ही शिवसेनेच्या युतीबाबत माध्यमांतून वाचले व पाहिले आहे. याबाबतची सखोल माहिती घेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले आहे. त्यांच्याशी बोलूनच निर्णय घेतला जाईल.उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उबाठा शिवसेना
कणकवलीत शिंदे व ठाकरे सेनेने अशी युती केल्यास भाजप रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शिंदे सेनेशी आम्ही संबंध तोडून टाकू.खा. नारायण राणे