

Marathwada Crop Loss Compensation
जवळाबाजार: राज्यात आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसानभरपाई वाटप करण्यात आली होती. त्यावेळी कोणतीही समिती नेमली नव्हती, पंचनामेही झाले नव्हते. आजही शासनाकडे तब्बल ३२ लाख शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध आहे, मग नुकसानभरपाई तत्काळ देण्यासाठी समितीची काय आवश्यकता आहे?, असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज (दि. ७) हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाटबंधारे वसाहत परिसरात झालेल्या या कार्यक्रमात ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, शेतकऱ्यांना फुकट खाण्याची सवय लागली आहे. पण शेतकरी आपल्या हक्काचे मागतो आहे. तो फुकट मागत नाही. उलट, सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची जमीन फुकट हवी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी. अन्यथा, शेतकरी दगाबाज सरकारचा पंचनामा करून दाखवेल, असा इशारा दिला.
ते पुढे म्हणाले की, आता निवडणुका जवळ आहेत. जर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही, तर प्रत्येक गावात फलक लावा. ‘युतीला मतदान करणार नाही’ असा निर्धार करा. शिवाय, शक्तीपीठ मार्गावरील शेतकऱ्यांचे प्रश्नही मार्गी लावावे लागतील, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.