मालवण ः राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जिथे कोसळला त्या घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि खा. नारायण राणे एकाच वेळी आल्यानंतर बुधवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले. घोषणा आणि इशारे सुरू झाल्यामुळे वातावरण खूपच तापले. काहीजणांना मारहाणही झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही बाजूंकडील नेते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे तासभर हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी कडे करून राणे समर्थकांना एका बाजूला घेतले व दुसर्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर हा राडा थंडावला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भरपावसात राजकोटवरूनच मोर्चाला सुरुवात केली आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. या सभेत सर्वच नेत्यांनी पुतळा दुर्घटनेच्या मुद्द्यावर सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, मालवण शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सिंधुदुर्गातील मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. त्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आले होते; तर दुसर्या बाजूला भाजप खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणेसुद्धा पाहणीसाठी आले होते. दोन्ही गट राजकोट येथील पुतळ्याजवळ एकत्र आल्याने शाब्दिक बाचाबाची झाली. धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे जवळपास एक तास राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांचीही पुरती दमछाक झाली.
महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी मालवणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले होते. आघाडीचा मोर्चा मालवण भरड नाक्यातून सुरू झाला होता. त्याचदम्यान काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार राजकोटवर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ जयंत पाटील दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी पुतळ्याची पाहणी करून आदित्य ठाकरे येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांची वाट पाहत ते थांबले होते. याचवेळी आदित्य ठाकरेंसह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. राजन साळवी आपल्या प्रमुख पदाधिकार्यांसह राजकोटवर दाखल झाले. तत्पूर्वी, भाजप नेते खासदार नारायण राणे, नीलेश राणे पुतळा पाहणीसाठी आले होते. यावेळी दोन्ही गट राजकोट येथे एकत्र आले. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने वातावरण तापले.
दोन्ही गटांकडून एकमेकांच्या समर्थनार्थ घोषणा सुरू केल्या. दुसरीकडे, या वादाची माहिती मिळताच ‘मविआ’चा मोर्चा राजकोटच्या दिशेने वळला. मोर्चात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. त्यातही शिवसैनिकांची संख्या मोठी होती. ते सर्वजण राजकोट किल्ल्याच्या मागील बाजूकडून किल्ल्यावर आले. भाजप कार्यकर्तेसुद्धा जमल्याने वातावरण अधिकच चिघळले. पोलिसांनी कुमकसुद्धा वाढवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाहेर येऊन ‘मविआ’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर खा. नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली व वाद थांबविण्यासाठी प्रयत्न केला; मात्र दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरूच होती.
दरम्यान, दोन्ही बाजूंकडील काही कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आली. दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते व पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते व पोलिस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. महाविकास आघाडीच्या लोकांनी राजकोटच्या मागील बाजूने बाहेर जावे, अशी मागणी नीलेश राणे पोलिसांकडे करत होते; तर आदित्य ठाकरे आम्ही समोरूनच आलो त्या मार्गाने जाणार, अशी भूमिका घेऊन होते. एकूणच पोलिस हतबल झाल्याचे चित्र दिसत होते. नंतर जादा कुमक मागवण्यात आली आणि पोलिसांचे कडे करण्यात आले. हे कडे राणे समर्थकांच्या भोवती उभे राहिले. राणे समर्थक कार्यकर्त्यांना एका बाजूला घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरी बाजू मोकळी करून तिथून महाविकास आघाडीचे नेते, शिवसैनिक, कार्यकर्ते यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला. हा मार्ग मोकळा केल्यानंतर स्थिती एक-दोन मिनिटे खूपच तणावाची होती. अखेर घोषणा देत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होऊन नियोजित स्थळी निघून गेले.
पोलिसांनी कडेकोट सुरक्षेत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांना राजकोट येथील पुतळ्याकडून बाहेर काढले. यावेळी ‘जय भवानी... जय शिवाजी...’च्या घोषणा देत आदित्य ठाकरे बाहेर आले. पायी चालत भरपावसात फोवकांडा येथील चौकात ते दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.
दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर शाब्दिक खडाजंगी होऊन धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की सोडविण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते. याचवेळी कुणी तरी तिथे असलेल्या जांभ्या दगडाचा एक तुकडा पोलिसांच्या दिशेने भिरकावला. तो सावंतवाडी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संभाजी राजाराम पाटील यांच्या डोक्याला लागला. यावेळी इतर पोलिस त्यांना सावरण्यासाठी आले. पाटील यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यांची आदित्य ठाकरे यांनी विचारपूस केली. त्यानंतर पाटील यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.